|| संतोष जाधव 

सर्वपक्षीय उमेदवारांच्या मिरवणुकांमध्ये रोजंदारीवरील ‘कार्यकर्ते’:- विधानसभा निवडणूक प्रचारात रंग आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. शेवटच्या काही दिवसांत जोरदार गर्दी खेचून मिरवणुका काढण्याचा प्रयत्न शहरातील विविध पक्ष करत आहेत. यात रिक्षासह सहभागी झाल्यास एक हजार रुपये, दुचाकीवाल्यांना ५०० रुपये, तर रॅलीमध्ये गर्दीत सहभागी महिलांना ३५० रुपये मिळत असल्याने शहरातील विविध पक्षांच्या प्रचार मिरवणुकांमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा आयात केलेली गर्दीच पाहायला मिळत आहे. या रॅलीमध्ये बहुतांश तरुणाईला रोजगार मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई शहरात ऐरोली व बेलापूर हे दोन मतदारसंघ, तर नवी मुंबई परिसरात पनवेल व उरण हे मतदारसंघ आहेत. बेलापूर मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी, मनसे अशी तिरंगी लढत होणार असून ऐरोली मतदारसंघातही भाजप, राष्ट्रवादी, मनसेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मुळातच विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारी अर्ज माघार घेतल्याची मुदत संपल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. नवी मुंबई हे सुशिक्षितांचे शहर आहे. शहरात सुशिक्षित टक्का अधिक असून उमेदवारांच्या प्रचार रॅलीमध्ये पक्ष कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होतात. प्रचार करण्यासाठी प्रत्येक पक्षाला व उमेदवारांना कमी दिवस मिळत असल्याने प्रचाराचे मुख्य लक्ष्य अनेकांनी प्रचार रॅली ठेवले आहे. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये पोहोचता येते तसेच जेवढी मोठी रॅली काढली जाते त्या रॅलीतील गर्दीवर या उमेदवाराच्या निकालाच्या ताकदीचे तर्कवितर्क लढवले जातात. त्यामुळे विविध पक्षांच्या प्रचार रॅलीमध्ये कार्यकर्ते व नेते वगळता भाडोत्री गर्दीच मोठी पाहायला मिळते. प्रत्यक्ष रॅलीच्या पूर्वतयारीचे प्रत्यक्ष पाहणी करून निरीक्षण केल्यानंतर निवडणुकीच्या काळात अशा भाडोत्री रिक्षा, दुचाकी, महिला अशा रॅलीतील सहभागासाठी माणसे पुरवण्याचे काम ठरावीक जणांना दिले जाते. त्या ठिकाणी रिक्षापुरवठा करणारा, दुचाकीपुरवठा करणारा, महिलांना प्रचारात सहभाग करून घेण्यासाठी असे पुरवठादार बनले आहेत. नेत्यांना जेवढी माणसे, रिक्षा, दुचाकी हव्या आहेत त्या सर्व गाडय़ा व माणसे नेता रॅलीमध्ये सहभागी होण्याआधी सज्ज केली जातात. त्यामुळे अशा प्रकारे सर्व विभागांत होणाऱ्या मिरवणुकांमध्ये माणसे पुरवणाऱ्यांचे गट आहेत.

रिक्षाला हजार रुपये

यात रिक्षाचालकासह रिक्षा रॅलीमध्ये सहभागी झाली तर १ हजार रुपये, तसेच दुचाकीस्वाराला ५०० रुपये, तर महिलांना ३५० रुपये दिले जात असल्याची माहिती या माणसे व तरुणाई पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने सांगितली. विविध ठेकेदारांमधील एक माणसे पुरवठा करणाऱ्या तरुणाने सांगितले की, त्याच्याकडे एका वेळी ६५० माणसे असून मागणीनुसार ती त्या त्या ठिकाणी पाठवली जातात.

ऐरोलीतील काही तरुण नेरुळमध्ये रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे रॅली सुरू होण्यापूर्वी या सर्व भाडेकरू प्रचारासाठी आणलेल्यांना प्रचारफेरी संपल्यावर पैसे मिळत असल्याचे सांगितले, तर नेरुळमधील एका पक्षाच्या रॅलीत कोपरखैरणे, ऐरोलीतील तरुणाई पाहायला मिळाली. त्यांना तुम्ही बेलापूर मतदारसंघातील रॅलीत सहभागी कसे काय झालात, असे विचारले तर त्या तरुणांच्या घोळक्याने आम्ही रोजच प्रचाराला विविध ठिकाणी जात असून दिवसाला जास्तीत जास्त पैसे कमावतो. १९ तारखेच्या संध्याकाळपर्यंत आम्हाला खूप मागणी असल्याचे एका महिलेने सांगितले.

राजकीय अनास्थेमुळे रस्त्यावर उतरून आरोळी ठोकणारा कार्यकर्ता लुप्त झाल्याची खंत काही राजकीय पदाधिकारी व्यक्त करत आहे, तर आम्हाला कोणत्याही भाडोत्री कार्यकर्त्यांची गरज लागत नसून आमच्या नेत्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते असल्याची भावना  एका राजकीय पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

विनाहेल्मेट

प्रचार रॅलीमध्ये दुचाकीस्वार तरुण मुले अगदी अल्पवयीन मुलेही सहभागी होत असून विनाहेल्मेट प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

‘मिरवणुकांची सोय करून देतो’

प्रचार मिरवणुका हाही एक ‘इव्हेन्ट’ ठरत आहे. नवी मुंबईतील मोजक्या कार्यकर्त्यांसह प्रचार रॅलीत सहभागी होऊन रात्रीच्या अंधारात माणसे,गाडय़ा दुचाकी, रिक्षा या सर्वाची सोय करून रॅली काढून देण्याचे काम आपण करत असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका उलवेमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने दिली.

एका उमेदवाराने माझी रिक्षा १० दिवस बुक केली आहे. त्यांचा ध्वनिवर्धक लावून शहराच्या विविध भागांत जाऊन प्रचार करायचा अशी नऊ रिक्षा भाडय़ाने घेतल्या असून त्यांना सातत्याने शहरात फिरायला सांगितले आहे. – राम दाते, रिक्षाचालक, नवी मुंबई