खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभांसाठी सर्वाधिक मागणी

विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात असताना ईशान्य मुंबईतील आघाडीचे उमेदवार मात्र हवालदिल झाले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचा धडाका लावलेला असताना आघाडीच्या उमेदवारांना मात्र वक्ते मिळेनासे झाले आहेत.

येथील काँग्रेसच्या उमेदवारांनी अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी आग्रह धरला असून अद्याप त्यांच्याही तारखा त्यांना मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात जाहीर सभा न होताच निवडणुकीला सामोरे जावे लागेल, या चिंतेत उमेदवार आहेत.

९ ऑक्टोबरला प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर ईशान्य मुंबईत महायुती, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकाच दिवशी भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर पश्चिम मतदारसंघात सभा घेतल्या. पाठोपाठ शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची भांडुप येथे, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मुलुंड येथे तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सायन येथे सभा झाली. मात्र अद्याप आघाडीच्या सहा उमेदवारांसाठी एकाही मोठय़ा नेत्याने वेळ दिलेली नाही.

प्रचाराच्या या अखेरच्या आठवडय़ात युतीतर्फे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पुरुषोत्तम रुपाला, भोजपुरी अभिनेता रवि किशन तर वंचिततर्फे अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्या सभा होणार आहेत. प्रचाराच्या पहिल्या आठवडय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मुलुंड, घाटकोपर पूर्व मतदारसंघात प्रचार सभा घेतील, अशी चर्चा होती.

ईशान्य मुंबईत काँग्रेसचे चार उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी आणि समाजवादीकडे प्रत्येकी एक जागा आहे. यापैकी एकाही मतदारसंघात महाआघाडीतर्फे मोठा नेता किंवा स्टार प्रचारक फिरकलेला नाही.  भांडुप, विक्रोळी मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्या तारखा मिळवण्यासाठी गेले तीन दिवस बरेच प्रयत्न केले आहेत. डॉ. कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका मालिकेतून साकारल्या. त्यांच्या सभांचा मतदारांमध्ये प्रभाव पडू शकेल, अशी उमेदवारांची अपेक्षा होती. मात्र डॉ. कोल्हे यांचीही वेळ अद्याप उमेदवारांना मिळालेली नाही.