28 September 2020

News Flash

बंडखोरी आणि समस्यांचे आव्हान

मतदारसंघांच्या पुनर्रचनेआधी मीरा-भाईंदरचा समावेश त्या वेळच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात होता. २००९ मध्ये मीरा-भाईंदर मतदारसंघ अस्तित्वात आला

|| प्रकाश लिमये

भाजपमधील बंडखोरीचा प्रश्न:- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते २०१७ मध्ये झालेल्या मीरा भाईंदर महनगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत सातत्याने भाजपच्या पाठीशी उभा राहणाऱ्या मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच भाजपमधील बंडखोरीमुळे चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यमान आमदार भाजपचे नरेंद्र मेहता या निवडणुकीत बालेकिल्ला राखण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मतदारसंघांच्या पुनर्रचनेआधी मीरा-भाईंदरचा समावेश त्या वेळच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात होता. २००९ मध्ये मीरा-भाईंदर मतदारसंघ अस्तित्वात आला. त्या काळी मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. महानगरपालिका देखील त्यांच्याच ताब्यात होती. या मतदारसंघाच्या पहिल्याच निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये चुरस लागली होती. काँग्रेसकडून मुझफ्फर हुसेन देखील इच्छुक होते मात्र राष्ट्रवादीने बाजी मारत उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेन्डोन्सा विजयी झाले. त्यावेळी शहरात भारतीय जनता पक्षाची ताकद फारशी नसतानाही भाजपच्या नरेंद मेहता यांनी मेन्डोन्सा यांना कडवी झुंज दिल्याने मेन्डोन्सा केवळ १० हजार ६०४ मतांनी विजयी झाले होते.

मात्र या निवडणुकीनंतर भाजपने ताकद प्रयत्नपूर्वक वाढवत नेली आणि त्याचे प्रत्यंतर २०१२ च्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत भाजपने पहिल्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या. त्यानंतर २०१४ मध्ये आलेल्या लोकसभा निवडणुकीने येथील राजकीय चित्रात फार मोठा बदल झाला. देशात त्या वेळी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे शहरात भाजपची ताकद मोठय़ा प्रमाणात वाढली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेन्डोन्सा आणि भाजपचे नरेंद्र मेहता पुन्हा आमने सामने आले. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली होती. मात्र त्यानंतरही भाजपचे नरेंद्र मेहता यांनी राष्ट्रवादीचे मेन्डोन्सा यांचा ३२ हजार २९२ मतांनी पराभव केला.

भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता आणि माजी महापौर तसेच भाजपच्या विद्यमान गीता जैन यांच्यात विस्तवदेखील जात नाही. गेल्या दोन वर्षांपासून गीता जैन यांनी मेहता यांच्या साम्राज्याला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत मेहता यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि भाजपकडून मेहतांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यामुळे गीता जैन यांनी बंडखोरी करत निवडणुकीसाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता भाजप, काँग्रेस आणि भाजपचा बंडखोर अशी तिरंगी लढत अटळ आहे. गीता जैन या गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करत आहेत. नरेंद्र मेहता यांच्या हक्काच्या मतांना सुरुंग लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परिणामी ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून मेहतांना गड राखण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. दुसरीकडे या दोघांतील मत विभाजनाचा फायदा उचलण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू करण्यात आली आहे.

शहरातील काही समस्या मार्गी लागल्या असल्या तरी धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीचा प्रश्न कायम आहे. या इमारतींच्या पुनर्बाधणीबाबतचे धोरण शासनाकडून अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. इमारतींच्या मानीव अभिहस्तांतरणात अडथळा ठरणाऱ्या इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या ना-हरकतीची समस्यादेखील कायम आहे. शहरात काही ठिकठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे काम सुरू झाले असले तरी अनेक मुख्य रस्त्यांची आज दयनीय अवस्था झाली आहे. हे रस्ते वारंवार नादुरुस्त होत आहेत. ५०० कोटी रुपयांची भूमिगत गटार योजनादेखील दहा वर्षांत पूर्ण होऊ  शकलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. झोपडीवासीयांसाठी सुरू झालेली बीएसयूपी योजनाही रेंगाळली आहे. याव्यतिरिक्त शहरात माफक दरात वैद्यकीय उपचार मिळणारे एकही अद्ययावत सरकारी रुग्णालय नाही, फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, उत्तनच्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा निघालेला नाही, अनधिकृत बांधकामेदेखील फोफावत आहे. अशा अनेक समस्यांची तड अद्याप लागू शकलेली नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत देण्यात आलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. टेंभा रुग्णालय सरकारकडे हस्तांतर झाले नाही, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाके हटविण्याचे अश्वासन हवेतच विरल्याने दहिसर येथील टोलनाका सुरूच असून त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासनदेखील पाळले गेले नाही.

-मुजफ्फर हुसेन, काँग्रेस 

दिलेल्या आश्वासनांची शंभर टक्के  पूर्तता तर केलीच उलट त्यापेक्षाही जास्त कामे केली आहेत. मतदारसंघासाठी शासनाकडून सर्वात जास्त निधी मंजूर करून आणला आहे. आमदार निधीसोबतच ५० कोटींचा विशेष निधी विकासकामांसाठी आणला.  योजना विक्रमी वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा दिला. एकात्मकि नाले, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, मेट्रो, उत्तन रस्त्याचे विस्तारीकरण आणि काँक्रीटीकरण, अतिरिक्त तहसीलदार कार्यालय मंजुरी आदी अनेक कामे प्रगतिपथावर आहेत  – नरेंद्र मेहता, आमदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 5:35 am

Web Title: vidhan sabha election bjp akp 94 2
Next Stories
1 ‘बंडो’बस्ताचे आव्हान!
2 गरब्यातील ‘रोड रोमिओ’ आणि चोरटय़ांवर पोलिसांची नजर
3 कोपर पुलावरील वाहिन्या मार्गी
Just Now!
X