अविनाश कवठेकर, / बाळासाहेब जवळकर, 

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमधील राजकीय वातावरण तापू लागले. विकासकामे आणि लोकांचे प्रश्न यापेक्षाही विविध मतदारसंघात प्रचारादरम्यान घडलेल्या अनपेक्षित घटनांनी त्या त्या मतदारसंघांमधील वातावरण ढवळून निघाले. कुठे बंडखोरी, कुठे बाहेरचा उमेदवार, कुठे पक्षप्रवेश, कुठे आरोप-प्रत्यारोप, कुठे विरोध, कुठे पाठिंबा या आणि काही घटनांचीच त्या-त्या मतदारसंघात चर्चा रंगली. या घटनांमुळेच मतदारसंघ चर्चेत आल्याचेही दिसून आले. निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी (१९ ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील आठ आणि पिंपरीतील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या घटनांची चर्चा सर्वाधिक झाली, यावर दृष्टिक्षेप.

कोथरूड – वेगवेगळे मनोरंजक वाद

भाजपने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून अनपेक्षित उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आतला-बाहेरचा हा वाद यानिमित्ताने रंगला. कोथरूडमध्ये ब्राह्मण विरोधात मराठा असे चित्रही पाटील यांच्या उमेदवारीनंततर राजकीय पक्षांकडून रंगविण्यात आले. ‘खंजीर खुपसला तरी मी पक्षाशी एकनिष्ठ,’ हे विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे विधानही उमेदवारी न मिळाल्याबद्दलची नाराजी स्पष्ट करणारे ठरले. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात समाजमाध्यामातून गमतीशीर प्रचार करण्यात आला. ब्राह्मण महासंघाने पाटील यांना दिलेला पाठिंबा, पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना अन्य राजकीय पक्षांनी दिलेले समर्थन हेही चर्चेचे विषय ठरले. मनसेकडून कोथरूड मतदारसंघाला प्राधान्य दिलेले असतानाही राज ठाकरे यांनी अगदी शेवटच्या टप्प्यात घेतलेली सभा हाही चर्चेचा विषय ठरला आहे.

शिवाजीनगर – विरोधानंतर महायुतीच्या उमेदवाराला. सर्वाचे सहकार्य

भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध करण्यात आला. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली, असाही आरोप सातत्याने करण्यात आला. घराणेशाही नको, असे थेट फलक सिद्धार्थ शिरोळे यांच्या उमेदवारीनंतर मतदारसंघात लागले होते. या मतदारसंघात शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसतानाही या जागेची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडून शिरोळे यांच्या प्रचारत सक्रिय सहभाग घेण्यात आला. दरम्यान, शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच या मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचेही पक्ष प्रवेश चर्चेचे ठरले. एकीकडे अन्य पक्षातील पदाधिकारी भाजपमध्ये येत असताना भाजपची यंत्रणाही सक्रिय झाली, त्यामुळे आधी रुसवे-फुगवे नंतर सहकार्य असे चित्र येथे दिसले.

पर्वती – आघाडीतील नाराजीचा फटका

पर्वती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेविका अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. दोन महिलांमध्ये ही लढत होत आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ  मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी बंडाचा पवित्रा घेतला. बागुल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कदम यांना भावनिक आवाहन करावे लागले. बागुल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी एकूणच काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील नाराजीचा मुद्दा कायम चर्चेत राहिला आहे. त्यामुळे मतदारसंघात सारे काही व्यवस्थित नाही, अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातच नाराज गट एकवटला आहे. त्याचा फायदा अप्रत्यक्षरीत्या भाजप उमदेवाराला होईल, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला असला तरी मनसेची मर्यादित ताकद आणि काँग्रेसची नाराजी हाच मुद्दा येथे मुख्य मुद्दा झाला आहे.

वडगावशेरी – राष्ट्रवादीचे माजी आमदार पठारे यांचा भाजपप्रवेश

भाजपचे विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर केली. वडगांवशेरी हा मतदारसंघ मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसने तगडा उमेदवार दिल्यामुळे जगदीश मुळीक यांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल, अशी शक्यता होती. या मतदारसंघात ताकद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांनी टिंगरे यांचा प्रचार करण्यास सुरुवातही केली; पण उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या पठारे यांनी मुळीक यांच्या मध्यस्थीने भाजप प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप झाला. पठारे यांचा दबदबा पाहता राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांचा, तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पाठिंबा मुळीक यांनाच मिळणार हे पठारे यांच्या भाजप प्रवेशाने स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक माजी पदाधिकाऱ्यांचेही यानिमित्ताने भाजपप्रवेश झाले. पठारे यांचा भाजपप्रवेश या निवडणुकीतील मोठीच घटना ठरली.

वडगावशेरी- महायुतीच्या विरोधात सेना बंडखोर

निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना आणि घटक पक्षांची महायुती आहे. जागा वाटपात पुण्यात शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेनेमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली. ती शमविण्यात यशही आले. मात्र कसब्यात नगरसेवक विशाल धनवडे यांची बंडखोरी कायम राहिली. भाजपच्या उमेदवार, महापौर मुक्ता टिळक यांच्याविरोधात प्रचार करण्यात त्यांनी आघाडी घेतली. त्यांचा प्रचार, खासदार गिरीश बापट यांच्यावर त्यांनी केलेले आरोप, कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी दिलेले सामूहिक राजीनामे याचीच चर्चा कसबा मतदारसंघात आहे.

कॅन्टोन्मेंट – काँग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये

स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे या मतदारसंघातून भाजपतर्फे आणि माजी मंत्री, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने या मतदारसंघातून उमेदवारी न दिल्यामुळे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत पक्षाच्या विरोधात थेट बंड पुकारले. काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या विरोधात त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची इच्छाही बोलून दाखविली. ते बंडखोरी करणार, अशी चर्चा सुरू झाली. पण नंतर शेट्टी यांनीच बंडखोरी करणार नाही, असे जाहीर केले. पण पक्षनेतृत्वाला आव्हान देत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.

काँग्रेस नेत्यांच्या मनधरणीनंतर शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र प्रचार सुरू झाल्यानंतर अचानक भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेट्टी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची पत्नी सुजाता शेट्टी काँग्रेसच्या नगरसेविका असल्यामुळे शेट्टी यांचा भाजप प्रवेश चर्चेचा विषय ठरला. उमेदवारी न मिळाल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपचे माजी उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी तो लगेचच मागे घेतला.

भाजपसाठी प्रत्येक भागातील मते आवश्यक ठरत असून शेट्टी यांच्यासह अनेक जणांचे जे भाजपप्रवेश झाले ते त्यासाठीच झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

हडपसर – मैत्रिपूर्ण लढतीची चर्चा

हडपसर विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे. हडपसरचे विद्यमान आमदार आणि निवडणुकीच्या रिंगणात असलेले योगेश टिळेकर यांच्यावर मनसे उमेदवार वसंत मोरे यांनी सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले. येवलेवाडी गावच्या विकास आराखडय़ात आरक्षण बदलण्याठी त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडून महागडी मोटार घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता.

त्याविरोधात वसंत मोरे यांनी आंदोलनेही केली.  हे मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचारात उचलण्यात आले. त्यावरून वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. गेल्या विधानसभा निवडणुकीतही हे तिन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आरोप-प्रत्यारोपांनीच ही लढत गाजली आहे. हे आरोप थेट भ्रष्टाचाराचे तसेच विकासकामे होत नसल्याचे असल्याने आणि त्याचे खंडन टिळेकर यांच्याकडून जोरदारपणे केले जात असल्याने हडपसरची लढत रंगली आहे.

खडकवासला – पक्षप्रवेशाचा मुद्दा अधिक रंगला

निवडणुकीपूर्वी खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास अनेक पदाधिकारी इच्छुक होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सामोपचाराने पाच नावे द्यावीत, असा निर्णय घेतला. त्यातून नगरसेवक सचिन दोडके यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. मात्र त्यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी मध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. दोडके यांचा प्रचार वेगवेगळ्या आघाडय़ांवर सुरू असला तरी अनेक पदाधिकारीही प्रचारात उतरले नाहीत, ही वस्तुस्थिती मतदारसंघात खुलेआमचर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्याही या मतदार संघात सभा झालेल्या नाहीत. त्यामुळे नाराजीची मोठी चर्चा येथे आहे. त्यातच राष्ट्रवादीचा महापालिकेतील एक पदाधिकारी काही समर्थक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाऊ लागल्यामुळे निवडणुकीपेक्षा हा पदाधिकारी कोण, हाच मुद्दा निवडणुकीतील नाराजी आणि प्रचारापेक्षा जास्त चर्चेचा ठरला आहे.

भोसरी – भोसरीत आजी-माजी आमदारांचे आरोप-प्रत्यारोपच गाजले

भोसरी मतदारसंघात एकमेकांचे जवळचे नातेवाईक (भाचेजावई विरुद्ध सासरे) असलेले आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यात थेट लढत आहे. सुरुवातीला शांत आणि निरस वाटणारी भोसरीची निवडणूक अंतिम टप्यात अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने वातावरणात काहीसा तणावही आहे.

भोसरीत सुरुवातीपासून वेगवेगळ्या घडामोडी होत आहेत. मूळचा हा मतदारसंघ शिवसेनेचा. मात्र, अपक्ष निवडून आलेले आमदार महेश लांडगे नंतर भाजपमध्ये गेले. त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेऐवजी भाजपला मिळाला. त्यामुळे शिवसैनिकांनी बराच थयथयाट केला. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार मनोमीलन झाले. तरीही दोन्हीकडे धूसफूस कायम आहे.

दुसरीकडे, भाजपकडून एकनाथ पवार आणि राष्ट्रवादीकडून दत्ता साने यांनी उमेदवारीवरून मोठमोठे दावे केले. प्रत्यक्षात त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी रिंगणात उतरण्याचे धारिष्टय़ दाखवले नाही. पाच वर्षांनंतर लांडे आणि लांडगे पुन्हा समोरासमोर आले. शेवटच्या दोन दिवसात प्रचारातील पातळी बऱ्यापैकी खालावली असून दोन्हीकडून गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

पिंपरी – बनसोडे, चाबुकस्वार  यांना आधी कडवा विरोध

पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्यात थेट सामना आहे. दोघांच्या बाबतीत समान धागा म्हणजे, सुरुवातीला त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता. आता मात्र सर्व मतभेद विसरून त्यांच्या कार्यकर्त्यांचा एकदिलाने प्रचार सुरू असल्याचे दिसून येते.

पिंपरीत २०१४ च्या विधानसभेत झालेल्या लढतीची पुनरावृत्ती यंदा होत आहे. चाबुकस्वार आणि बनसोडे या आजी-माजी आमदारांची दुरंगी लढत अंतिम टप्प्यात रंगतदार आहे. चाबुकस्वार यांना शिवसेनेतून उमेदवारीसाठी विरोध होता. मात्र, सर्व जुळवाजुळव झाल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळाली. बनसोडे यांना सोडून कोणालाही उमेदवारी द्या, इथपर्यंत राष्ट्रवादीत त्यांच्याविषयी नाराजी होती. त्यातूनच पक्षाच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. प्रत्यक्षात बंडाळीचा धोका लक्षात घेऊन बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली.

दोन्ही उमेदवारांसमोर सुरुवातीला पक्षातील नाराजी दूर करण्याचे आव्हान होते. त्यात यश आल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात दोन्हीकडचे सर्व घटक एकदिलाने काम करताना दिसून येत आहेत.

चिंचवड – बारणे-जगताप पुन्हा एकत्र

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील सुमारे १० वर्षांचा संघर्ष शहरवासियांनी जवळून अनुभवला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेले त्यांचे मनोमीलन खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येत आहे.

खासदार बारणे आणि आमदार जगताप यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने चिंचवड विधानसभा आहे. पूर्वाश्रमीचे घनिष्ट मित्र असलेल्या बारणे आणि जगताप या दोन्ही नेत्यांत २००९ पासून शत्रुत्व निर्माण झाले. २०१९ पर्यंत त्यांच्यात वेगवेगळ्या मुद्दय़ांवरून सातत्याने संघर्ष होत राहिला. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप-शिवसेना युती झाली, तेव्हा त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ते एकत्र आले. लोकसभा निवडणुकीत बारणे मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. तेव्हा जगताप त्यांच्याबरोबर होते. आता विधानसभेसाठी जगताप रिंगणात आहेत. बारणे त्यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत. दोघांमधील जवळीक पाहून युतीच्या कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.

जगतापांसमोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार राहुल कलाटे हे एकेकाळी जगताप यांच्या जवळचे होते. कालांतराने त्यांच्यात मतभेद झाले. पुढे, कलाटे आणि बारणे जवळ आले. मात्र, त्यांच्यातही दुरावा निर्माण झाला.