|| दयानंद लिपारे

अटीतटीची लढत झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यतील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धक्कादायक पराभव झाला. चार जागांवर विजय मिळवलेल्या काँग्रेसचे चांगभले झाले. जनसुराज्याचे विनय कोरे, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले प्रकाश आवाडे हे माजी मंत्री पुन्हा विधिमंडळात पोहोचले. राष्ट्रवादीने हसन मुश्रीफ व राजेश पाटील यांच्या रूपाने संख्याबळ टिकवून ठेवले असले, तरी या पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अपक्ष विजय मिळवत स्वाभिमानीचे स्वप्न भंग केले. महायुतीतील बेबनावामुळे जिल्ह्य़ात शिवसेनेला ५ आणि भाजपाला २ जागा गमवाव्या लागल्या.

कोल्हापूर शहरातील उत्तर व दक्षिण या दोन्ही जागी काँग्रेसने यश मिळवले. सर्वात लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक (९७ हजार ३९४) यांचा काँग्रेसच्या ऋतुराज पाटील (१ लाख ४० हजार) यांनी ४० हजारांवर मताधिक्य घेत दारुण पराभव केला. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत महाडिक यांचा पराभव करण्यात आमदार सतेज पाटील यांना यश आले आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये मुळचे भाजप असलेल्या आणि काँग्रेसकडून लढलेल्या उद्योगपती चंद्रकांत जाधव (९१ हजार ५३) यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर (७५ हजार ८५४) यांना १५ हजार १९९ मतांनी पराभूत केले. करवीर मतदार संघात शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे लाखाहून अधिक मते मिळूनही (१ लाख ११ हजार) काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील (१ लाख ३३ हजार) यांच्याकडून पराभूत झाले. सलग दोन निवडणुकांत थोडक्या मतांनी हरलेले पाटील या वेळी तब्बल २२ हजार ६३४ मताधिक्य घेत पुन्हा विधानसभेत पोहोचले. हातकणंगले मतदार संघात माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजू आवळे यांनी शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची हॅटट्रिक रोखली. आवळे पितापुत्रांना पराभूत करणारे मिणचेकर (५० हजार ८२५) हे ११ हजार ८७५ मतांनी हरले. आवळे यांच्या पारडय़ात ६२ हजार ७०० मते पडली. येथे जनसुराज्यचे अशोक माने हे पहिल्या काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर राहिल्याने वेगळा निकाल लागण्याची चिन्हे दिसत होती.

राष्ट्रवादी जैसे थे स्थितीत

कोल्हापूर जिल्ह्यचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोर शाहू उद्योग समूहाचे युवा नेते, म्हाडा पुणेचे माजी अध्यक्ष समरजित घाटगे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. मुश्रीफ यांनी (१ लाख १४ हजार) यांनी घाटगे (८७ हजार ३२३) यांच्यावर २६ हजार ८७७ मतांनी मात केली. येथे शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. दोन घाटगेंच्या मतविभागणीत मुश्रीफ यांचा विधानसभेचा रस्ता सोपा बनल्याचे दिसते. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यतील दुसऱ्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने येथे राष्ट्रवादीने गोकुळचे संचालक राजेश पाटील यांना उमेदवारी देण्याचा डाव यशस्वी ठरला. राजेश पाटील हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्गीय मानले जाणारे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्यापेक्षा ३४३८ मताधिक्य मिळवून निवडणुकीत विजयी झाले. तर वंचित आघाडीचे विनायक ऊर्फ अप्पी पाटील हे तिसऱ्या R मांकावर राहिले. शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर यांना चौथ्या R मांकावर मते मिळाली. येथे अप्पी पाटील व राजेश पाटील यांच्यातील पारडे सतत झुकत राहिले. चौदाव्या फेरीपर्यंत अप्पी पाटील हे आघाडीवर होते. त्यांना ३९ हजार  ६२७, राजेश पाटील यांना ३८ हजार ६९९, शिवाजी पाटील यांना ३२ हजार ५३८ आणि कुपेकर यांना २५ हजार १०१ मते मिळाली होती. सोळाव्या फेरीला राजेश पाटील यांच्या मताधिक्यात वाढ झाली.

आवाडे, कोरे पुन्हा आमदार

इचलकरंजीमध्ये भाजप सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर हे हॅटट्रिक करण्याच्या तयारीत होते. मात्र, काँग्रेसला रामराम केलेले अपक्ष प्रकाश आवाडे (१  लाख १६ हजार) यांनी जिल्ह्यत सर्वाधिक मतांनी विजयाची नोंद करताना ४९ हजार ८१० मतांनी विजय प्राप्त केला. येथे हाळवणकर (६७ हजार ०७६) हे दुसऱ्या तर काँग्रेसचे राहुल खंजिरे (७२६२) तिसऱ्या स्थानी राहिले. \सुरुवातीपासून घेतलेली आघाडी आवाडे यांनी अखेरच्या फेरीपर्यंत कायम टिकवली. असाच प्रकार शाहूवाडी-पन्हाळा मतदार संघात घडला. जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे (१ लाख २४ हजार) यांनी २७ हजार ८६३ मतांनी विजय मिळवताना शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील (९७ हजार) यांना पराभूत केले. शाहूवाडी तालुक्यात पाटील यांना मताधिक्य होते, पण पन्हाळा तालुक्याने कोरे यांना भरभरून साथ दिल्याने ते पुन्हा विधानसभेत दिसणार आहेत.

स्वाभिमानी-सेना पराभूत

शिरोळ तालुक्यात यड्रावकर कुटुंबीयांनी चार वेळा निवडणूक लढवली पण यशाने हुलकावणी दिली. या वेळी जोरदार तयारीने उतरलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आघाडीने उमेदवारी नाकारून स्वाभिमानीला दिली. पण अपक्ष लढत यड्रावकर यांनी अखेर विजयाचा गुलाल लुटला. बहुरंगी लढतीत राजेंद्र पाटील (९० हजार ३८) यांनी घेताना शिवसेनेचे उल्हास पाटील ( ६२ हजार २१४) यांच्यावर २७ हजार ८२४ मतांनी मात केली. स्वाभिमानीचे सावकार मादनाईक (५१ हजार ८०४) तिसऱ्या तर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आणि जनसुराज्यकडून लढणारे अनिल यादव (१४ हजार ७७६) हे चौथ्यास्थानी राहिले.