संगणक, मोबाईल जप्त

 नागपूर :– भाजप नेते व महापालिकेतील आरोग्य सभापती वीरेंद्र ऊर्फ विक्की कुकरेजा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सुरू केलेल्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकून अनेक संगणक व मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून मतदारांना पैसे व दारूचे वाटप करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. याप्रकरणी कोमल खुबचंदानी व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून  विक्की कुकरेजा यांना आरोपी करण्यात आलेले नाही.

जरीपटका परिसरातील जिंजर मॉलच्या पाठीमागे लर्निग प्रायमरी स्कूल आहे. या स्कूलमध्ये विक्की कुकरेजा यांनी निवडणूक प्रचार कार्यालय थाटले होते. विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार असल्याने दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी प्रचार थांबला. त्यानंतरही विक्की कुकरेजा आपल्या कार्यालयातून लोकांना मोबाईलवर संदेश पाठवून प्रचार करीत असून लोकांना दारू व पैशाचे वितरण करीत असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर भरारी पथकाने जरीपटका पोलिसांच्या मदतीने शाळेत छापा टाकला असता तेथील खोलीत चार ते पाच संगणक व तेवढय़ा प्रमाणाच मोबाईल होते. त्यावेळी विक्की कुकरेजा खोलीत बसून होते. भरारी पथकाने चौकशी केली असता ते मतदारांना संदेश पाठवत असल्याची माहिती दिली. भरारी पथकाने सर्व साहित्य जप्त केले व जरिपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या ठिकाणी भरारी पथकाला पैसे व दारू सापडली नसल्याची माहिती आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आदर्श आचार संहितेचा उल्लंघन केल्याची तक्रार दिली असून त्या आधारावर पोलिसांची पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

आचारसंहितेचे उल्लंघन नाही

उत्तर नागपुरात निवडणुकीच्या कामासाठी वॉर रुम तयार करण्यात आली होती आणि तेथून मतदारसंघाचे काम सुरू होते. तेथे आचारसंहितेचे कुठलेही उल्लंघन झाले नाही. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी मात्र समाज माध्यमांवर तसे व्हायरल केले. त्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी प्रतिक्रया भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास आणि उत्तर नागपूरचे प्रचार प्रमुख विकी कुकरेजा यांनी दिली. मतदानाच्या दिवशी काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणून ही कारवाई केली. कुठलाही आर्थिक व्यवहार केला जात नव्हता त्यामुळे पैसे नव्हते, याकडेही कुकरेजा यांनी लक्ष वेधले.