हा विरोधकांचा रडीचा डाव; काँग्रेसचा आरोप

अंबरनाथ विधानसभेची जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आली असतानाही येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रवीण खरात यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आघाडीत बिघाडीची चर्चा होती. मात्र वरिष्ठांकडून दबाव आणत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराशी मनोमीलन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचार केला जात नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे प्रचार पत्रक वाटले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. हा विरोधकांचा रडीचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या वतीने रोहित साळवे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतरही अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवारी अर्ज प्रवीण खरात यांनी दाखल केल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र काँग्रेसचेच काम करणार असल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले होते. असे असताना गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरातील विविध भागांत मतदारांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण खरात यांचे प्रचार पत्रक वाटले जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मतदान यंत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडय़ाळ चिन्हाला तिसऱ्या स्थानी जागा मिळाली आहे, तर काँग्रेस चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

रडीचा डाव

या प्रकारानंतर काँग्रेस पुन्हा आक्रमक झाली असून याबाबत ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत असून त्यांचे उमेदवार खरात आमचा प्रचार करत आहेत. मात्र विरोधकांची ही खेळी असून मतदारांना भुलवण्याचे प्रकार विरोधकांकडून केले जात आहेत असे त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेसचा प्रचार उत्तम सुरू असून आमच्या प्रचारात अडथळा आणण्याचे हे प्रयत्न असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.