पूर्व, पश्चिम मतदारसंघांमध्ये युतीविरोधात आव्हान

ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा हातात हात घालून लढवू ही शिवसेना-भाजप नेत्यांची घोषणा हवेत विरली असून कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघांत युतीत बंडखोरी झाली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या विरोधात उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोराडे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने संतापलेल्या भाजप नेत्यांनी कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ठाणे जिल्ह्य़ात भाजपला संपविण्याची शिवसेनेची रणनीती आहे, असा आरोप आमदार गायकवाड यांनी या वेळी केला.

कल्याण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केला होता. पवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच संघाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते असल्याने पक्षाच्या आदेशानंतर ते उमेदवारी मागे घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत होती. शिवसेनेने या मतदारसंघातून विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिली आहे. पवार यांच्या उमेदवारीमुळे भोईर धोक्यात येतील हे लक्षात आल्याने शिवसेना नेतेही हे बंड शमविण्यासाठी आग्रही होते. मात्र कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेचे धनजंय बोराडे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने संतापलेल्या भाजप नेत्यांनी पवार यांनाही रिंगणात कायम ठेवत शिवसेनेला धक्का दिला आहे. या दोन मतदारसंघांत झालेल्या बंडखोरीमुळे निवडणूक चुरशीची बनली असून संपूर्ण जिल्ह्य़ात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये या बंडाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, पवार यांनी बंडखोरी कायम ठेवताना गायकवाड यांच्याशी चर्चा केली तसेच दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेटही घेतली. त्यामुळे या बंडाला वरिष्ठ पातळीची साथ असल्याची चर्चाही रंगली आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे धनंजय बोडारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे युतीचे उमेदवारी गणपत गायकवाड यांच्या समोर आव्हान उभे राहिले आहे. मागच्या वेळी थोडय़ा फरकाने गायकवाड विजयी झाले होते. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार १० ते १५ हजाराच्या दरम्यान मते घेतात. प्रस्थापित उमेदवाराच्या आघाडीला मागे खेचतात. अशात बोडारे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघातही युतीच्या मतदारांमध्ये फाटाफूट होणार आहे. या दोन्ही बंडखोरांवर पक्ष काय कारवाई करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.