|| प्रबोध देशपांडे

महायुतीत विसंवाद व गटबाजी:- वाशीम जिल्हय़ातील तिन्ही मतदारसंघात खऱ्या अर्थाने काटय़ाच्या लढती होत असल्याचे चित्र आहे. महायुतीतील विसंवाद व गटबाजीमुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून, मतदारांची नाराजी भोवण्याची चिन्हे आहेत. भाजप व शिवसेनेमध्ये युतीधर्म पाळला जात नसल्याची ओरड होत आहे. महाआघाडीमध्येही रिसोडमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारीवरून नाराजीनाटय़ रंगले. वंचितने सामाजिक समीकरणानुसार उमेदवार रिंगणात उतरवल्याने चुरस वाढली. सर्वच मतदारसंघात चौरंगी लढती होत आहेत. यामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

जिल्हय़ातील वाशीम, रिसोड व कारंजा मतदारसंघात तुल्यबळ लढती आहेत. युतीच्या जागावाटपात भाजप व शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. विद्यमान आमदारांचे मतदारसंघ कायम राखण्याच्या नादात भाजपने शिवसेनेसाठी रिसोड मतदारसंघ सोडला.

या निर्णयाचे विपरीत परिणाम तिन्ही मतदारसंघांवर पडले आहेत. विशेष म्हणजे, वाशीम जिल्हय़ात महायुतीमध्ये कुठलाही समन्वय नसल्याने भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे कळते. कारंजा व वाशीममध्ये शिवसेनेला, तर रिसोडमध्ये भाजपला महत्त्व दिले जात नसल्याची स्थिती आहे.

वाशीममधून भाजपकडून आ. लखन मलिक यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा उमेदवारीची माळ टाकली. गेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे शिवसेनेचे उमेदवार शशिकांत पेंढारकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. प्रचार फलकांवर शिवसेनेच्या स्थानिक खासदार आणि शिवसेना नेत्यांचे छायाचित्र असल्याने युतीतील बिघाडी दिसते. काँग्रेसकडून डॉ. रजनी राठोड, तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सिद्धार्थ देवळे लढत आहेत. शिवसेनेची बंडखोरी भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. वाशीममध्ये चौरंगी लढत आहे.

कारंजा मतदारसंघावरून जिल्हय़ात भाजप व शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली. भाजपने विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना रिंगणात उतरवले. हा निर्णय भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांची कामगिरी सुमार राहिल्याचा आरोप प्रचारात होत आहे.

मतदारसंघात असमाधानकारक पाऊस असताना राजेंद्र पाटणींनी परिस्थिती चांगली असल्याचे वक्तव्य केले होते. दुष्काळाच्या यादीत कारंजा व मानोरा तालुक्यांचा समावेश न केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा जबर फटका बसला. त्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये पाटणींविषयी प्रचंड रोष आहे. मतदारसंघ बाहेरील म्हणूनही त्यांच्या विरोधात नाराजी दिसते.

गठ्ठा मतदान असलेल्या बंजारा समाजाची नाराजीही त्यांना भोवण्याची शक्यता आहे. शिवबंधन बांधलेले प्रकाश डहाके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन गतवेळी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर केला. भाजपकडून महत्त्व मिळत नसल्याने शिवसेना डहाकेंच्या प्रचारात गुंतल्याचे दिसून येते.

बंजारा व शेतकऱ्यांमधील नाराजी त्यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. मागीलवेळी भारिप- बमसंकडून लढत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे युसूफ पुंजानी यावेळी बसपच्या हत्तीवर स्वार झाले आहेत. वंचितकडून डॉ. राम चव्हाण व मनसेच्या तिकिटावर डॉ. सुभाष राठोड रिंगणात आहेत. येथे जातीय समीकरण निर्णायक ठरणार असून, चौरंगी लढत होत असल्याचे चित्र आहे.

रिसोड मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान आमदार अमित झनक यांच्यापुढे काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या बंडखोरीचे आव्हान आहे. भाजपकडून लढण्यासाठी अनेक इच्छुक असताना हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला. सेनेने विश्वनाथ सानप यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात भाजप दूरावा ठेवून आहे.

राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अमित झनक यांचे समर्थक दिलीप जाधव यांनी वंचितचे ‘सिलिंडर’ हाती घेतले. बंडखोरी व वंचितच्या प्रभावामुळे काँग्रेसच्या परंपरागत मतपेढीचे विभाजन होण्याची चिन्हे आहेत. ते झनक यांच्या हॅट्ट्रिकच्या आड येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारसंघातील चौरंगी सामना लक्षवेधी ठरत आहे. जिल्हय़ातील सर्वच मतदारसंघात तुल्यबळ व चुरशीच्या लढती होत आहेत.

‘दुधाची तहान ताकावर’

बंजारा समाजाची मतपेढी लक्षात घेऊन केंद्रीय भाजपाध्यक्ष अमित शहांच्या पोहरादेवी येथील दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, त्यांनी संत डॉ. रामराव महाराजांची भेट टाळल्याने बंजारा समाजात नाराजी पसरली. संत डॉ. रामराव महाराजांचे दर्शन व भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न केले. हा प्रकार म्हणजे ‘दुधाची तहान ताकावर’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बंजारा समाजाचा रोष उमेदवारावर असून, समाजाची नाराजी दूर करण्यासाठी खटाटोप सुरू आहे.