|| इंद्रायणी नार्वेकर

शिवसेना-भाजपकडून प्रस्थापित आमदारांना उमेदवारी देण्यात आलेली असताना त्यांच्याविरोधात उभे ठाकलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार अगदीच नवोदित असल्याने मतदारांमध्ये आपली प्रतिमा पोहोचविण्याकरिता या उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

विधानसभेला जिंकून येण्याची खात्री असली तरी शिवसेना-भाजपने बहुतांशी मतदारसंघांत विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली आहे. भाजपने तर कालिदास कोळंबकर, राहुल नार्वेकर यांच्यासारखे आयात उमेदवार दिले आहेत. काँग्रेसनेदेखील वर्षां गायकवाड, अमिन पटेल, भाई जगताप, नसीम खान, अस्लम शेख अशा विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली आहे. मात्र पक्षाचे उर्वरित बहुतांश उमेदवार नवखे आहेत. ही परिस्थिती राष्ट्रवादी आणि मनसेचीही आहे. मुंबईतील बडय़ा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षांतर केल्यामुळे या राजकीय पक्षांना नवीन उमेदवार तयार करणे भाग पडले आहे.

मनसेने माजी नगरसेवक संदीप देशपांडे आणि विद्यमान नगरसेवक संजय तुर्डे यांच्याव्यतिरिक्त सगळे नवीन उमेदवार दिले आहेत. मनसेने सर्व मतदारसंघांतील विभाग अध्यक्षांना या वेळी संधी दिली आहे. निवडणूक लढवण्याचा अनुभव नसला तरी त्या त्या विभागातील प्रश्नांची त्यांना माहिती असल्याने त्यावरच प्रचारात भर देण्याचा या उमेदवारांचा प्रयत्न असेल.

बोरिवलीत काँग्रेसने कुमार खिल्लारे, दहिसरमध्ये अरुण सावंत, चारकोपमध्ये कालू बुद्धेलिया, जोगेश्वरीत सुनील कुमरे असे नवीन उमेदवार दिले आहेत. सायन कोळीवाडा मतदारसंघात काँग्रेसने युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांना संधी दिली आहे. तर वांद्रे पूर्व मतदारसंघात झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने वसरेवामध्ये संदेश देसाई, मागाठाणेत नयन कदम, दहिसरमध्ये राजेश येरुणकर अशी नवीन नावे दिली आहेत. अर्थात यातील काही उमेदवारांचा विविध आंदोलनांमध्ये पुढाकार होता.

संदेश देसाई यांनी गेल्या वर्षी महागाईविरोधात डी. एन. नगरमध्ये मेट्रो थांबविली होती. त्यांचे सेल्फी विथ खड्डे हे आंदोलनही गाजले. या विभागात एसआरएचे दहा प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. अनेकांना भाडेही मिळालेले नाही, असे मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जाणार असल्याचे संदेश देसाई सांगतात.