शिवसेनेच्या २६ नगरसेवकांचे राजीनामे; बंडखोर बोडारे यांना पाठिंबा

युती होऊनही कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेली दरी आणखी रुंदावत चालली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजपचे गणपत गायकवाड यांच्या उमेदवारीस विरोध करीत कल्याण पूर्व आणि उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेच्या २६ नगरसेवकांनी आपल्या पक्षातील पदांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहेत. हे सर्व नगरसेवक आता येथून निवडणूक लढवणारे शिवसेना बंडखोर धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ जाहीरपणे उतरले आहेत.

‘बंडखोर उमेदवाराचा प्रचार करताना पक्ष आणि पदाची कोणतीही अडचण नको म्हणून आम्ही हे राजीनामे देत आहोत. आमचा पक्ष, पक्षप्रमुख, नेत्यांवर कोणताही राग किंवा नाराजी नाही,’ असे राजीनामा दिलेल्या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचा मागील १५ वर्षांत विकास झाला नाही. त्यामुळे या वेळी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रासाठी युतीने नवीन चेहरा द्यावा, अशी मागणी आम्ही शिवसेना, भाजप नेत्यांकडे केली होती. मात्र, ती पूर्ण न झाल्याने शिवसेना नगरसेवक आणि पक्षांतील पदांचे राजीनामे दिले आहेत, असे कल्याण पूर्व विधानसभा संघटक प्रशांत काळे यांनी म्हटले. या नगरसेवकांखेरीज कल्याण पूर्व, उल्हासनगरमधील एकूण १०० हून अधिक शहरप्रमुख, विभागप्रमुख, शहर संघटक, शाखाप्रमुख यांनी राजीनामे दिले आहेत.

मागील पाच वर्षांत आमदार गणपत गायकवाड यांनी स्थानिक नगरसेवक, सेना पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला नाही. विकासकामांबाबत कोणाला कधी विश्वासात घेतले नाही. नगरसेवकांच्या विकासाच्या अडचणींबाबत चर्चा केली नाही. जो आमदार संवाद साधण्यास कचरतो तो कसली विकासकामे करणार, हा विचार करून या वेळी बोडारे यांचे काम करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, असे काळे म्हणाले.

‘बंडखोरी नाही’

एका व्यक्तीने स्वार्थासाठी केले ते बंड असते. आम्ही सर्वानी मिळून एकत्रितपणे उठाव केला आहे. त्याला बंड म्हणता येणार नाही. त्यामुळे मी बंडखोर उमेदवार नाही, असे उमेदवार धनंजय बोडारे यांनी सांगितले. कल्याण पूर्वेतील एकूण १६, ग्रामीण भागातील दोन, उल्हासनगरमधील १० नगरसेवकांनी आपणास पाठिंबा दिला आहे, असे ते म्हणाले.