मंदा म्हात्रे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी; अशोक गावडे यांचे ‘मराठा कार्ड’

नवी मुंबई : नवी मुंबईतील दोन मतदारसंघातील लढती तुल्यबळ नसल्या तरी उमेदवारांनी दगदग सोसून प्रचाराला सुरुवात केली आहे. यात बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी  शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठका घेऊन प्रचार मिरवणुकांचे नियोजन केले. मनसेचे गजानन काळे हे तरुणाईला आवाहन करीत आहेत, तर आणि राष्ट्रवादीच्या अशोक गावडे यांनी ‘मराठा कार्ड’ बाहेर काढले आहे. ऐरोली मतदारसंघात मनसेच्या नीलेश बाणखेले यांना नवख्या शिलेदारांसोबत प्रचार करावा लागत आहे.

सकाळच्या बैठकांनंतर दुपारी गृहसंस्थांमध्ये दौरा

बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हात्रे सकाळी प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. दहानंतर त्यांच्या प्रचाराला वेग येत आहे. विविध भागातील गृहसंस्थांमधील प्रचाराबरोबरच विविध संघटना आणि संस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. म्हात्रे यांचा प्रचारातील उत्साह कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. म्हात्रे यांचा प्रचार दोन टप्प्यांत होत आहे. आधी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रचारातील मुद्दय़ांना स्पर्श केला जात आहे. सोमवारी सकाळी म्हात्रे यांचा पहिला कार्यक्रम हाच होता. निवासस्थानी सकाळी भेटायला आलेल्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर वाशी आणि नेरुळ येथील विविध गृहसंस्थांमध्ये प्रचारास सुरुवात केली. बेलापूर मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याबाबत काहीसे गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची त्यांनी त्यांच्या बेलापूर येथील निवासस्थानी बैठक घेतली.

मतदारांना भावनिक साद

नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात विरोधक गाववाले व बाहेरवाला असा भेदभाव केला जात आहे. बेलापूर मतदारसंघामध्ये मोठय़ा प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज राहात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा गट नवी मुंबईत असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे बेलापूर मतदारसंघातील उमेदवार अशोक गावडे यांनी मराठा कार्ड बाहेर काढले आहे.  नवी मुंबईकर हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीला मानणारे मतदार आहेत.

राष्ट्रवादीचे अशोक गावडे हेही दोन टप्प्यांत प्रचार करीत आहेत. सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचाराला सुरुवात होते. राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांच्या भेटीवर गावडे भर देत आहेत. सकाळी गृहसंस्थांतील मतदारांच्या भेटी आणि रात्री नेरुळ व सीवूड्स परिसरात प्रचार मिरवणुकीवर भर दिला जात आहे. त्यानंतर त्यांनी भीमाशंकर येथे सभेचे आयोजन केले होते.

मिरवणुकांऐवजी पायी प्रचार 

तिरंगी लढतीत मनसेचे गजानन काळे यांचाही प्रचार दौरा सकाळीच सुरू होतो. मोठमोठय़ा प्रचार मिरवणुकांऐवजी गृहसंस्थांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळी ९ ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत सुमारे दहा किलोमीटरचा पायी प्रचार करीत असल्याचा दावा काळे यांनी केला आहे. सोमवारी त्यांचा नेरुळ येथील ‘सीसीडी’ येथे ‘कॉफी विथ गजानन’ हा कार्यक्रम पार पडला.

(दगदग तरीही, धावपळ कायम)

ऐरोली मतदारसंघात नीलेश बाणखेले यांना मनसेच्या वतीने संधी मिळाली आहे. ऐरोली मतदारसंघात बाणखेले यांच्यासोबत असलेल्या बहुतांश मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीचा अनुभव नाही. त्यामुळे समन्वयाचा अभाव दिसून येत होता. सोमवारी कोपरखैरणे येथे ठरलेली प्रचाराची वेळ कार्यकर्त्यांना गाठता आली नाही. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस प्रचार करून थकल्याने कार्यकर्ते येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. रविवारी मनसेने दिवसभर घणसोली प्रभाग पिंजून काढला.

सोमवारी कोपरखैरणे सेक्टर १९, १८, १६, १५ मध्ये सकाळच्या सत्रात फिरून थेट मतदारांच्या भेटी घेतल्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास शहर सचिव सचिन आचरे यांच्या कार्यालयात प्रचाराची रणनीती ठरली आणि त्यानंतर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश शिंदे यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे पाच वाजल्यापासून होते. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भ्रमणध्वनीवरून नियोजित कार्यक्रमाची माहिती शिंदे देतात. यात तयारीचा आढावा घेतला जात असतो.

सकाळी आठच्या सुमारास सर्व प्रचार कार्यालयांना धावती भेट आणि त्यानंतर प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर शिंदे यांचा भर असतो.

दुपारी एकनंतर जेवणासाठी विश्रांती. त्यानंतर सायंकाळी छोटय़ा प्रचार फेऱ्या आणि चौक सभा असा कार्यक्रम असतो. रविवारी ऐरोली मतदारसंघात दुचाकी मिरवणूक काढण्यात आली.

त्यामुळे सोमवारी दुपारनंतर उत्साहात प्रचार सुरू करण्यात आला. रविवारी झालेली प्रचंड धावपळ आणि दगदग पाहता सोमवारी सकाळच्या सत्रात प्रचाराला विराम देण्यात आला. मात्र शिंदे यांनी सोमवारी त्यांच्या कोपरखैरणे येथील कार्यालयात बसून सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे.