लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात दणदणीत आघाडी मिळाल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांना यंदाच्या निवडणुकीत काहीच अडचण नव्हती. मतांची आघाडी किती मिळेल, हाच चर्चेचा विषय होता. परंतु भाजपच्या मुरजी पटेल यांनी बंडखोरी केल्यामुळेच आता ही निवडणूक चुरशीची झाली आहे. केवळ त्यामुळेच आता काँग्रेस उमेदवारही शर्यतीत आला आहे.

मोठय़ा प्रमाणात औद्योगिक वसाहत, झोपडपट्टी, चाळी असलेल्या या मतदारसंघात एक लाखाच्या आसपास असलेला मराठी मतदार हा सेनेचे प्रमुख बलस्थान आहे. त्याखालोखाल उत्तर भारतीय (५५,२००), मुस्लीम (३६,४००), गुजराती-राजस्थानी (३३,६००), दक्षिण भारतीय (१८,६००), ख्रिश्चन (१४, ५००) या मतदारांचा समावेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती नसल्याने सेनेच्या लटके यांना फक्त साडेपाच हजारांची आघाडी घेता आली. लटके यांना ५२ हजार ८१७ तर भाजपच्या सुनील यादव यांना ४७ हजार ३३८ मते मिळाली. याचा अर्थ मराठी मतदारांनी पाठिंबा दिला असला तरी मनसेमुळे मतांचे विभाजन झाले. सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपनेही आपले स्थान निर्माण केल्याचे दिसून आले. काँग्रेसचा पारंपरिक मतदार दुरावला गेल्याचेही या निवडणुकीत दिसून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीची ताकद दिसून आली आणि कीर्तीकर यांना तब्बल ९७ हजार ७२७ मते मिळाली. काँग्रेसच्या संजय निरुपम यांच्यापेक्षा त्यांना ५० हजार अधिक मते मिळाली. गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी भाजपचे सुनील यादव सोबत असल्याने लटके निर्धास्त होते. परंतु मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सेना असा प्रवास करीत भाजपमधून नगरसेवक झालेले मुरजी पटेल यांनी बंडखोरी केल्यामुळे आता लटके यांना आव्हान निर्माण झाले आहे. एरवी मुरजी पटेल यांना कोणी गांभीर्याने घेतले नसते. परंतु त्यांचा दांडगा संपर्क आणि स्वखर्चाने मतदारसंघात ठिकठिकाणी केलेल्या कामांमुळे त्यांचा बोलबाला असल्याचे जाणवते. कदाचित त्यामुळे पटेल यांनी कसा भ्रष्टाचार केला, अशी ओरड करताना भाजपचे सुनील यादव दिसतात. पटेल भाजपत होते तोपर्यंत यादव यांनी या भ्रष्टाचाराबद्दल अवाक्षरही काढले नव्हते. भाजपची काही मते फुटली तरी त्याचा फायदा काँग्रेसला होणार नाही, असा दावा करण्यात सेना मश्गूल आहे. त्यावरूनच पटेल यांचा धसका घेतल्याचे दिसून येत आहे. एक मात्र नक्की की, पटेल यांच्यामुळे काँग्रेसचे उमेदवार जगदीश अमीन हे शर्यतीत आल्याने आता तिरंगी लढत अटळ आहे.

प्रामुख्याने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला या मतदारसंघात २००९ मध्ये सेनेच्या लटके यांचा काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी यांनी पराभव केला होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २५ हजार मते घेतल्याच्या बळावर. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. लटके हे फक्त पाच हजार ४७९ मतांनी निवडून आले. मनसेच्या दळवींना नऊ हजार मतांवर समाधान मानावे लागले. यंदा मनसेतून रिंगणात कुणी नाही. भाजपकडून बंडखोरी होणार, अशी चिन्हे दिसत होती. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुरजी पटेल यांनी बंडखोरी केलीच. गेल्या पालिका निवडणुकीत ते पत्नी केसरबेन हिच्यासह भाजपच्या तिकिटावर नगरसेवक बनले. परंतु जातीचा अवैध दाखला सादर केल्यामुळे या दाम्पत्याचे नगरसेवकपद रद्द झाले असले तरी त्यांनी मतदारसंघ चांगलाच बांधून ठेवला होता. याच जोरावर त्यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची त्यांना छुपी साथ आहे. पटेल यांच्यामुळे सेनेलाही जोरदार आव्हान निर्माण झाले आहे. या मतदारसंघात उघड उघड बंडखोरी झालेली असतानाही भाजपने पटेल यांना पक्षातून काढलेले नाही. त्यामुळे पक्षाचा छुपा पाठिंबा तर नाही ना, अशी चर्चाही ऐकायला मिळत आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.

प्रमुख समस्या

वाहतुकीची प्रचंड कोंडी, दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, अनेक झोपडपट्टीत नागरी सेवासुविधांचा प्रश्न, पिण्याचा पाण्याची समस्या, पावसाळ्यात सखल भागात तुंबणारे पाणी, आरोग्याचा प्रश्न, सांडपाण्याचा निचरा, शाळकरी मुलांना वेळेत शाळेत पोहोचणे वाहतूक कोंडीमुळे अशक्य होत आहे.