सेनेच्या उपविभागप्रमुख पटेल यांच्या बंडखोरीमुळे लव्हेकर यांचा मार्ग बिकट

विनायक मेटे यांच्या ‘शिवसंग्राम’च्या डॉ. भारती लव्हेकर या भाजपच्या कमळ चिन्हामुळे गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत आमदार बनल्या. युती नसतानाही त्यांना यश मिळाले याचे कारण म्हणजे शिवसेनेच्या राजुल पटेल यांचा बाद झालेला निवडणूक अर्ज. आता सेनेच्या उपविभागप्रमुख पटेल यांनी बंडखोरी केल्यामुळे लव्हेकर यांचा मार्ग बिकट बनला आहे. त्यात दोघांतील भांडणाचा लाभ तिसऱ्याला (म्हणजे काँग्रेसला) होण्याची शक्यता आता बळावू लागली आहे.

मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वर्सोवा या नव्या मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसचे बलदेव खोसा विजयी झाले होते. परंतु २०१४ च्या मोदी लाटेत खोसा यांना फक्त २२ हजार ७८४ मते मिळाली. त्याच वेळी युती नसतानाही डॉ. लव्हेकर यांच्या पदरात ४९ हजार १८२ मते पडली. सेनेच्या राजुल पटेल यांचा अर्ज बाद झाल्याचा फायदा लव्हेकर यांना झाला. यंदा पटेल यांचा जोर किती आहे, यावर लव्हेकर यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. लव्हेकर यांची प्रचाराची धुरा सांभाळणारे ‘शिवसंग्राम’चे दिलीप माने यांनी बंडखोरीमुळे आघाडी थोडी कमी झाली तरी विजय निश्चित असल्याचा दावा केला.

गेल्या पाच वर्षांत लव्हेकर यांनी मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी शिवसेनेला दुखावलेच. दुसरीकडे भाजपेच मोहित भारतीय ऊर्फ कंबोज यांनी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केल्यामुळे लव्हेकर यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, अशीच चर्चा होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेतील तुरळक उपस्थिती ही चिंतेची बाब बनली आहे.

गेल्या निवडणुकीत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ला १४ हजार ५०८ मते मिळाली. २००९ च्या निवडणुकीपेक्षा ती वाढली होती. राजूल पटेल यांची म्हणजे सेनेची मते मनसेला गेली असावीत, असा ही एक आंदाज आहे. गेल्या वेळी ‘एमआयएम’च्या तिकिटावर २० हजार १२७ मते मिळविणारे अब्दुल हमीद शेख हे आता वंचित बहुजन आघाडीतून उभे आहेत. मनसेचे संदेश देसाई हेदेखील रिंगणात आहे. त्यामुळे मुस्लीम आणि मराठी मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.

यारी रोड, बेहराम बाग, जोगेश्वरी पूर्व असा एक लाखाच्या आसपास मुस्लीम तर त्याहून थोडा कमी उत्तर भारतीय मतदार हा या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संजय निरुपम यांना ५९ हजार ५६२ तर कीर्तीकर यांना ६९ हजार ६१ मते मिळाली होती. म्हणजे त्यावेळी जेमतेम दहा हजारांचा फरक होता. हीदेखील युतीसाठी चिंतेची बाब आहे. त्यातच बंडखोरी महागात पडण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा काँग्रेसच्या बलदेव खोसा यांना होऊ शकतो. खोसा यांना मुस्लीमबहुल मतदारसंघातून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही वा निरुपमही सक्रिय नाहीत, ही युतीच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. परंतु हाच कल या मतदारसंघाचे भवितव्य ठरविणार आहे.

विद्यमान आमदार डॉ. लव्हेकर यांचेही मुस्लीमबहुल परिसरात चांगले काम आहे. राजुल पटेल यांचाही तगडा संपर्क आहे. त्याच वेळी सेनेचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्यासोबत असल्यामुळे उत्तर भारतीय मतदारही त्यांच्या बाजूने आहेत. सेनेचे चार तर भाजपचे फक्त दोन नगरसेवक असल्यामुळेच सेनेने या मतदारसंघावर दावा सांगितला होता. तोच रोष राजुल पटेल यांच्या माध्यमातून सेनेने काढला आहे. या मतदारसंघात जेमतेम ४५ हजारांच्या आसपास मराठी मतदार (सरदार पटेल नगर, लोखंडवाला संकुल, समर्थ नगर) आहेत. ही मते काँग्रेस, सेना आणि भाजपात विभागली जात असल्यामुळे मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतांवरच येथील आमदार ठरतो. या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी विकासक रईस लष्करिया हेही प्रयत्नशील होते. ‘एमआयएम’मार्फत चंगेश मुलतानी इच्छुक होते. मुस्लीम मतांचे जोरदार विभाजन अपेक्षित आहे. वेसावे कोळीवाडाही या मतदारसंघात येतो. हा मतदार पूर्वी काँग्रेसच्या बाजूने होता. हा मतदार तसेच मुस्लीम मतदार कुठे झुकतो यावर या मतदारसंघातील विजयी उमेदवाराचे गणित अवलंबून आहे. मात्र या भांडणात गिनतीतही नसलेल्या काँग्रेस उमेदवाराला महत्त्व प्राप्त झाले आहे.

समस्या

कोळीवाडय़ांच्या पुनर्विकासासाठी विकास आराखडय़ात तरतूद करण्याचे फक्त आश्वासन; प्रत्यक्षात काहीच नाही. वाहतुकीची प्रचंड कोंडी सोडविण्यासाठी काहीही योजना नाही, रस्त्यांच्या दुरवस्थेकडेही दुर्लक्ष, अपुरा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रयत्न नाहीत.

मतदारसंघ हद्द

वेसावे कोळीवाडा, यारी रोड, बेहराम बाग, मिल्लत नगर, स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला संकुल, सरदार वल्लभभाई पटेल नगर, म्हाडा.