|| शैलजा तिवले

महापालिकेशी संबंधित प्रकल्पांचा कार्यअहवालांमध्ये समावेश:- आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार करणाऱ्या आमदारांमध्ये पालिकेने केलेल्या कामांचेच श्रेय लाटण्यासाठीची चढाओढ सुरू आहे. शहरातील पालिका रुग्णालयांच्या विस्तारापासून ते पंपिंग स्टेशनच्या बांधणीपर्यंतची कामे केल्याचा दावा आमदारांनी कार्य अहवालांमध्ये केला आहे. इतकेच नव्हे तर पुढील पाच वर्षांत वाहनतळ, पाणीप्रश्न सोडवण्याचे गाजर दाखवले जात आहे.

आमदारांना त्यांच्या कारकीर्दीत विकासात्मक कामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी सरकारकडून दिला जातो. या निधीचा वापर करत शहरातील बहुतांश आमदारांनी मतदारसंघामधील सोसायटय़ांना पेव्हर ब्लॉक बसविणे, व्यायामशाळा, बालवाडी, शौचालय बांधणी, जलवाहिन्या, मलनि:सारणाच्या पाइपलाइन इत्यादी बाबींवर खर्च केला आहे. जाहीरनाम्यांमध्ये कामांची यादी जाहीर करताना मात्र मतदारसंघातील पालिकेने केलेल्या कामांची यादीही आपल्या नावावर जाहीर केली आहे. यात पालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आमदारांनी आपल्या नावावर खपवले आहेत.

आमदार रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी येथे केलेल्या महत्त्वाच्या कामांमध्ये बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर, शिल्पग्रामची निर्मिती या पालिकेने केलेल्या कामांच्या नोंद केलेली आहे. तर दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी पालिका शाळेत नववीचे वर्ग सुरू करणे आणि त्या मार्गावर बसेसची सुविधा उपलब्ध केल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. सायन कोळीवाडय़ाचे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांनी ३२०० खाटांचे धारावीतील नवे शीव रुग्णालय सुरू केल्याचे कार्य अहवालात जाहीर केले आहे. तसेच प्रतीक्षानगरमधील रस्तेबांधणीसह नवीन जलवाहिन्या टाकल्याचेही यात सेल्वन यांनी म्हटले आहे. मागाठाणेच्या प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या महत्त्वाच्या कामांमध्ये रावळपाडा व अशोकवन परिसरात पालिकेचे ३०० खाटांचे प्रसूतिगृह, स्वस्त दरात बोरिवली कुलूपवाडी येथे पालिकेचा जलतरण तलाव, नॅन्सी बस डेपोच्या वरील भागात मल्टिस्पेशालिटी रुग्णालय यांचा उल्लेख केलेला आहे. गझधर येथील पंपिंग स्टेशनचे बांधकाम, भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण, खार येथील पशुवैैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम केल्याचा दावा आमदार आशीष शेलार यांनी केला आहे. त्यामुळे आमदारांनी त्यांच्या कार्य अहवालात सादर केलेली जंत्री पुन्हा आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवकांच्या अहवालात पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटू नये.

वचननाम्यातही ‘तेच ते’!

विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी विक्रोळीतील महात्मा फुले सर्वसाधारण पालिकेच्या रुग्णालयाचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे आश्वासन वचननाम्यात दिले आहे. मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी भातसा धरणाची क्षमता वाढवून प्रत्येक घरात मुबलक पाणी, सार्वजनिक पार्किंगची समस्या दूर करण्याचे वचननाम्यात जाहीर केले आहे. वर्सोवाचे अपक्ष उमेदवार राजुल पटेल यांनी स्वच्छ वर्सोवाअंतर्गत तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा व्यवस्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. मनसेचे वर्सोव्याचे उमेदवार संदेश देसाई यांनी वर्सोव्यामध्ये पालिकेचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय, महानगरपालिकेच्या आरोग्य चौक्याची उभारणी, पालिकेच्या शाळा अद्ययावत करण्याचे वचननाम्यात म्हटले आहे.

आमदारांची ‘वैशिष्टय़पूर्ण’ कामे

  • मागाठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांना शिर्डी, त्र्यंबकेश्वर यात्रा, महिलांसाठी महालक्ष्मी यात्रा तसेच विभागातील २३०० नागरिकांना काशी विश्वनाथ तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून सर्वासमवेत गंगामातेची आरती केल्याचे प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे.  आई-वडिलांचा सन्मान करणाऱ्या मुलांना दिल्लीतील राष्ट्रपती भवन, मुंबईतील विधान भवनाची भेट अशी कामे सुर्वे यांनी केली आहेत.
  •  मोफत मोक्षधाम सेवा आणि कोणाच्या घरी मृत्यू झाल्यास त्या दिवशी जेवणाचा डबा पाठविण्याचे काम घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी गेल्या पाच वर्षांत केले.
  •  आमदार मंगेश कुडाळकर यांनी १७१ सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष कार्य अधिकारी (एसईओ) म्हणून नेमणूक केली.
  •  वर्षां गायकवाड यांनी धारावीतील घराघरांमध्ये मोदकाच्या प्रसादासह भेट देण्याचे काम केले.