• जागा वाटपाचा तिढा कायम
  •  प्रचारासाठी अल्प कालावधी
  •  आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असताना प्रमुख राजकीय पक्षांतील जागा वाटपाचे त्रांगडे अद्याप सुटत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणती जागा कोणाला मिळणार, याबद्दल साशंकता आहे. राजकीय पक्ष अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर करून इच्छुकांना इतरत्र उडय़ा मारण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. परंतु, तिकीट मिळणार की नाही, या संभ्रमावस्थेत इच्छुकांना निवडणूक प्रचार, तयारी करण्यास मर्यादा पडल्या आहेत.

जिल्ह्य़ात विधानसभेचे १५ मतदारसंघ असून उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. चार ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज दाखल करण्यास आठ दिवसांचा कालावधी असून नंतर प्रचाराला उमेदवारांना केवळ १४ दिवस इतका अत्यल्प कालावधी मिळणार आहे. असे असले तरी राजकीय पक्षांना त्याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याची स्थिती आहे. किंबहुना असा विलंब करण्यामागे इच्छुकांनी इतर पर्याय शोधू नये, असेही डावपेच असल्याची शक्यता खुद्द इच्छुकांकडून व्यक्त कर्यात येत आहे.  शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचे वाद अद्याप मिटलेले नाहीत. सद्यस्थितीत जिल्ह्य़ात केवळ एमआयएमने मालेगाव मध्य आणि आम आदमी पक्षाने नांदगाव मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे. हे दोन पक्ष आणि या दोन जागांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

गेल्यावेळी सेनेला देवळाली, मालेगाव बाह्य़, निफाड, सिन्नर या जागांवर विजय मिळाला. या ठिकाणी सेना पुन्हा विद्यमान आमदारांना संधी देईल. भाजपची मात्र तशी स्थिती नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाईल की नाही, याबद्दल कानावर हात ठेवले आहे. कामगिरी, पक्षासाठी केलेले काम, सर्वेक्षण लक्षात घेऊन उमेदवार निवड करण्याच्या पध्दतीने विद्यमान आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. संबंधितांचे विरोधकही तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. या स्पर्धेत कोण तिकीट मिळविण्यात यशस्वी होईल हे सांगणे अवघड आहे. परंतु, ज्याला तिकीट मिळेल, त्याची कमी दिवसात प्रचार करताना दमछाक होईल. आघाडीत येवला, नांदगाव, दिंडोरी, बागलाण हे राष्ट्रवादीकडे, तर इगतपुरी, मालेगाव मध्य हे काँग्रेसकडे आहेत. इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी सेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या ताब्यातील नाशिक मध्य मतदारसंघ राष्ट्रवादी मागत आहे. दुसरीकडे नांदगाव मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला देण्याची मागणी होत आहे. मालेगाव बाह्य़ जागेसाठी राष्ट्रवादी उत्सुक नसल्याने तो काँग्रेसला सोडण्याची मागणी पुढे आली आहे.

या गोंधळात तिकीट वाटपाचा विषय बाजूला राहिला आहे. कोण कोणत्या जागांवर लढणार, यावर वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झालेले नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत घोळ मिटत नसल्याने इच्छुकांची अस्वस्थता वाढत आहे. काहींनी पक्षाने उमेदवारी नाकारल्यास अन्य पर्याय चाचपून ठेवले आहेत. काहींनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. उमेदवारी यादी जाहीर होण्याकडे सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष आहे.

जागांवर दावा-प्रतिदावा

मागील निवडणुकीत नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि चांदवड या चार जागांवर भाजपने यश मिळवले होते. यातील नाशिक पश्चिम मतदारसंघ मिळवण्यासाठी सेना आग्रही आहे. दुसरीकडे नांदगाव मतदारसंघात सेना दुसऱ्या क्रमांकावर होती. परंतु, तृतीयस्थानी राहिलेल्या भाजप-सेनेत हजार मतांचा फरक होता. यामुळे नांदगाववर भाजपने दावा सांगितला आहे. इतरही काही जागांवर दावे-प्रतिदावे केले जात असल्याने जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. सेना-भाजपमध्ये कोणाला किती जागा मिळणार यावर एकमत होत नसल्याने अंतिम क्षणी युती होते की गत्वेळेप्रमाणे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतात याबद्दल धास्ती व्यक्त होत आहे.