वेगवेगळ्या माध्यमांतून मतदारांशी संवाद

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत आपलाही काही वाटा असावा, या उद्देशाने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नांदगाव मतदारसंघातील उमेदवारांच्या सौभाग्यवतींनी प्रचारात उडी घेतली आहे. वेगवेगळ्या प्रकारे कल्पकता लढवीत मतदारांशी संपर्क साधण्याचा त्यांच्या प्रयत्नाने प्रचाराची रंगत वाढविली आहे.

मतदानातील महिला मतदारांचा टक्का पाहता ही मते मिळविण्यासाठी सर्वच प्रमुख उमेदवारांचा आटापिटा सुरू आहे. त्यातच विद्यमान आमदार काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या पत्नी विशाखा भुजबळ यांनी मनमाडहून निघणाऱ्या गोदावरी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत आपले पती पंकज भुजबळ यांचा प्रचार गाण्याच्या माध्यमातून करत बोगीतील सर्व प्रवाशांचे लक्ष वेधले.

विशाखा आणि त्यांच्यासोबतच्या महिलांनी झुक झुक झुक आगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहू या.. विकासाच्या गावाला जाऊ या, अशा ओळी गात मतदारसंघाच्या विकासाला भुजबळांची कशी गरज आहे, हे प्रवाशांना पटवून दिले. त्यांच्याशी हितगुज करीत संवाद साधला. ग्रामीण भागातील

महिलांशी थेट संवाद साधण्यासाठी विशाखा यांनी महिला मजुरांबरोबर शेतात जाऊन कांद्याच्या उळ्याची  लागवड केली. शेतीची परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रवादीची कृषीविषयक धोरणे कशी उपयोगी ठरतील, हे विशाखा यांनी सांगितले.

दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजूम यांनी कासारी, ढेकू, कुसुमतेल, चंदनपुरी, वसंत नगर तांडा येथे आदिवासींच्या वाडय़ा-पाडय़ांवर जाऊन प्रचार केला. विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार रत्नाकर पवार यांच्या पत्नी आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या अर्थ, बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी मनमाडच्या आठवडे बाजारात प्रचार केला. खेडय़ांवरून भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या महिलांशी संवाद साधला. तसेच कार्यालयात येऊन त्यांनी आपल्या पतीला मिळालेल्या शिट्टी या निशाणीचा प्रचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक कार्यकर्त्यांकडून करून घेतले.