दहा हजारांच्या फौजफाटय़ासह निमलष्कर दलाचा बंदोबस्त

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी सहा वाजेनंतर थंडावणार असून या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्हा निवडणूक विभागाने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार केली आहे. या सर्वच केंद्रांवर मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून दहा हजारांच्या फौजफाटय़ासह निमलष्कर दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. आवश्यकता भासली तर ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. याशिवाय, शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून त्याचबरोबर अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यांपैकी काही मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती रंगल्या आहेत.

अखेरच्या टप्प्यातील प्रचार सुरू असून त्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या प्रचाराच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करीत आहेत. त्यामुळे शहरात अजूनपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.

येत्या शनिवारी सायंकाळी सहा वाजेनंतर प्रचार थंडावणार असून या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे. त्यामुळे ठाणे शहराचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी आता मतदानाच्या दिवशी जिल्ह्य़ात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत असून हे दोन्ही मतदारसंघ वगळून उर्वरित १६ मतदार संघांमध्ये ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी दहा हजारांचा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. तसेच जिल्ह्य़ातील ५९१ संवेदनशील मतदान केंद्रांवर अर्धसैन्य दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय, ठाणे ग्रामीण पोलीस गरज पडल्यास सुरक्षेसाठी ड्रोनचाही वापर करणार आहेत. रविवार दुपारपासून हा बंदोबस्त तैनात केला जाणार असून हा बंदोबस्त सोमवारी मतदान संपेपर्यंत असणार आहे.

असा असेल बंदोबस्त

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ हा परिसर येतो. जिल्ह्य़ातील १८ पैकी १३ मतदारसंघ ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या मतदारसंघामध्ये ४ हजार १४२ मतदान केंद्र आहेत. या ठिकाणी पोलीस आयुक्त, साहाय्यक आयुक्त, ४ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० उपायुक्त या अधिकाऱ्यांसह सुमारे ७ हजार ५०० पोलीस कर्मचारी, १ हजार २०० होमगार्ड, निमलष्कर दलाचे १ हजार ३०० जवान तैनात केले जाणार आहेत. तर ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक क्षेत्रात शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण आणि मीरा-भाईंदर असा परिसर येतो. या क्षेत्रामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील काही मतदारसंघांचा काही भाग येतो. त्यामुळे या ठिकाणी नऊ मतदारसंघ आहेत. या ठिकाणी १ हजार ५१० मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांवर शंभर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह १ हजार ८०० कर्मचारी, ८०० होमगार्ड, ३ केंद्रीय पोलीस दलाच्या कंपन्या असा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

५९१ संवेदनशील मतदान केंद्रे

जिल्ह्य़ात एकूण ६ हजार ४८८ मतदान केंद्रे असून यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ५९१ इतकी आहे. सर्वात जास्त संवेदनशील मतदान केंद्रेही डोंबिवलीमध्ये असून अशा केंद्रांची संख्या ४५ इतकी आहे. तर कल्याण ग्रामीणमध्ये ४४, ओवळा माजिवडामध्ये ४२, मीरा-भाईंदरमध्ये ३९, कल्याण पूर्वमध्ये ३८, कल्याण पश्चिममध्ये ३७, भिवंडी ग्रामीणमध्ये ३६, कोपरी पाचपाखाडीमध्ये ३४, मुरबाडमध्ये ३१, भिवंडी पश्चिममध्ये २९, अंबरनाथमध्ये २९, ठाणे येथे २९, शहापूर येथे २२, उल्हासनगर येथे २२, कळवा मुंब्रा २२ तर भिवंडी पूर्वेत २१ आणि नवी मुंबईत ७१ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.