ऐरोलीतील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पदयात्रा केल्याने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. म्हात्रे यांची उमेदवारी कायम राहावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘प्रतिष्ठेचा प्रश्न’ केला होता. तेच मुख्यमंत्री बेलापुरात न येता ऐरोलीत गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंदा म्हात्रे यांच्यासाठी सभा होत असल्याचा प्रचार सर्मथकांनी सुरू केला आहे. बुधवारी खारघरमध्ये पंतप्रधानांची सभा ठाण्यासह कोकणातील महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी होत आहे.

नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघात शिवसेना भाजप महायुतीचे गणेश नाईक आणि काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार गणेश शिंदे अशी लढत होणार आहे. ही लढत तशी एकतर्फी मानली जात असल्याने नाईकांच्या मताधिक्याबद्दल चर्चा केली जात आहे. हे मताधिक्य वाढावे यासाठी नाईक गटाकडून जोरदार  प्रयत्न केले जात आहेत. भाजपचा प्रचार तीन पातळ्यांवर सुरू आहे.

त्यामुळे राज्य पातळीवरुन केंद्र तसेच इतर राज्यातील नेत्यांना प्रत्येक मतदार संघ वाटून दिला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीतील खासदार मनोज तिवारी यांनी नुकताच नवी मुंबईत ठाण मांडून पक्षाने दिलेला प्रचार केला आहे. सावंत यांनी वैद्यकीय क्षेत्रातील मतदारांशी संवाद साधला, तर तिवारी यांनी उत्तर भारतीय मतदारांशी हितगुज केले.

नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघांत अशा प्रकारे इतर राज्यातील नेते, कार्यकर्ते, प्रचारक सध्या कार्यरत आहेत. केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या संपर्कात राहून शहराचा विकास साधता यावा यासाठी नाईक यांनी निवडणूक पूर्व भाजप प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे. त्याआधी नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांनी सहा महिने आधी तयारी सुरू केली होती. भाजपची प्रचार दिशा ‘निवडणूक संचालन कक्ष’द्वारे ठरवली जाते, मात्र या अगोदर प्रादेशिक पक्षात काम केलेले नाईक यांचे ठरविणे ते धोरण असल्याने प्रचाराची मोहीम त्यांच्या वतीने आखली जात होती.

त्यामुळे भाजपाच्या त्रिस्तरीय प्रचारा बरोबरच नाईक यांचा चौथा स्तरावर प्रचार सुरु आहे. यामुळे  नाईक यांच्या गोटातून इतर राज्यातील काही प्रचारकांना माघारी पाठविल्याचे समजते. अशा वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना कोकणातील सभा आटपून ऐरोलीतील पदयात्रेसाठी आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम हा भाजप कार्यालयातून ठरविला जात आहे. तो टाळण्याचा प्रयत्न सहसा मुख्यमंत्री फडणवीस यांनाही कधी केलेला नाही. या कार्यक्रमात ऐरोली मतदारसंघासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते, असे समजते.