|| राजेश्वर ठाकरे

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आघाडी मिळाल्याने या पक्षासाठी उत्तर नागपुरात विधानसभेत अनुकूल परिस्थिती राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच बहुजन समाज पार्टीने यावेळी  पक्षाची पहिली जागा जिंकण्यासाठी याच मतदारसंघाची निवड केल्याने उत्तर नागपुर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासमोर लढतीत टिकून राहण्याचे कडवे आव्हान आहे.

शहरातील अनुसूचित जातीसाठी राखीव मतदासंघात भाजप, काँग्रेस आणि बसपाची तिरंगी लढत होणार आहे. मात्र, विद्यमान आमदारांबद्दल नकारात्मक मत कोणाच्या पथ्यावर पडतात, यावर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ भाजप नको या एकमेव मुद्यावर या मतदारसंघात मतदान झाले. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शहरातील सहापैकी  फक्त उत्तर नागपुरातूनच काँग्रेसच्या नाना पटोलेंपेक्षा ८ हजार ९१० मते कमी मिळाली होती. हाच कल विधानसभेतही राहिल्यास भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो.

भाजपचे विद्यमान आमदार डॉ. माने यांना यावेळी उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा पक्षातच होती. पण पक्षाने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली. पक्षांतर्गत सर्वेक्षणाचा कल त्यांच्या बाजूने असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. ते पक्षात गडकरी समर्थक आमदार म्हणून ओळखले जातात. पण निष्क्रियतेच्या मुद्याला त्यांच्या विरोधकांनी प्रचारात प्रमुख स्थान दिले आहे. मात्र त्यांची स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे. काँग्रेस नेते व या भागाचे माजी आमदार डॉ. नितीन राऊत पुन्हा रिंगणात उतरले आहेत. २०१४ मध्ये पराभूत होऊनही त्यांचा मतदारसंघाशी संपर्क आहे. शिवाय दलितेत्तर समाजाशीही त्यांनी तेवढेच सलोख्याचे संबंध कायम ठेवले आहे. बौद्ध विहाराच्या माध्यमातून ते समाजाशी संपर्कात आहेत. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात  झालेली कामे ही त्यांची ओळख आहे. परंतु पक्षांतर्गत मतभेदाचा फटका त्यांना यावेळीही बसू शकतो. नगरसेवक मनोज सांगोळे आणि संदीप सहारे यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता, पण पक्षश्रेष्ठींनी त्याला भीक घातली नाही. त्यामुळे हा गट सध्या त्यांच्यावर नाराज आहे.

बसपाने यावेळी महाराष्ट्रात पक्षाचे खाते उघडण्यासाठी याच उत्तर नागपूरची निवड केली आहे. त्यासाठी २०१४ मध्ये या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली दुसऱ्या क्रमांकाची मते हे प्रमुख कारण आहे. थोडा प्रयत्न केला तर ही जागा मिळू शकते म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनाच येथून रिंगणात उतरवले आहे. ते बसपाशी विद्यार्थी दशेपासून जुळलेले आहेत. शिवाय पक्षाचे कॅडर हे त्यांचे बलस्थान आहे. मात्र, ते ज्या कंपनीत काम करीत होते, ती कंपनी बुडल्याने अनेकांचे पैसे बुडाले. त्यामुळे अजूनही या मतदारसंघातील काही नागरिक त्यांच्यावर नाराज असल्याचे कळते.

भाजपचे डॉ. मिलिंद माने येथून २०१४ मध्ये विजयी झाले होते. त्यांनी या भागातून सलग तीनदा आमदार असलेल्या राऊत यांचा पराभव केला होता. भाजप-काँग्रेस -बसपा अशा तिहेरी लढतीत माने विजयी झाले व राऊत हे तिसऱ्या क्रमांकावर होते. दलित मतांच्या विभाजनाचा फायदा माने यांना मिळाला होता. बसपाकडून तेव्हा निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. यावेळी गजभिये काँग्रेसमध्ये आहे. २०१९ च्या लोकसभेत बसपाला या मतदारसंघात प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. परंतु यावेळी राज्यात खाते उघडण्याच्या ईर्षेने बसपा कामाला लागली आहे. खुद्द पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची सभा येथे झाली. या भागात दलितेतर मतांची अलीकडे मोठी भर पडली आहे. त्यामुळे हा वाढलेल्या मतदारांचा कौल निर्णायक ठरू शकतो. वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे उमेदवारही रिंगणात आहे. त्यांच्यामुळेही दलित मतांचे विभाजन होण्याचा धोका आहे.

उत्तर नागपूर मतदारसंघ

  • एकूण उमेदवार- १४
  • एकूण मतदार- ३,८३,६६३
  • २०१४ चा कौल
  • डॉ. मिलिंद माने (भाजप)- ६८, ९०४
  • किशोर गजभिये (बसपा)- ५५,१८७
  • नितीन राऊत (काँग्रेस)- ५०,०४२