|| राम भाकरे

कधीकाळी काँग्रेसचा गड असलेला पण आता भाजपचा बालेकिल्ला असलेला पूर्व नागपूर मतदारसंघ  भाजप तिसऱ्यांदा काबीज करते की काँग्रेस या मतदारसंघात पुन्हा ‘कमबॅक’ करते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. एकूण ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजप-काँग्रेस यांच्यातच आहे.

भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यावेळी तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने नगरसेवक पुरुषोत्तम हजारे हा नवीन चेहरा दिला आहे. तेली समाजबहुल हा मतदारसंघ असल्याने दोन्ही पक्षांनी याच समाजाला प्रतिनिधित्व दिले असले तरी इतर समाज विशेषत: हिदी भाषिक या भागात मोठय़ा प्रमाणात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघातून तब्बल ७५ हजार मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे खोपडे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली. तिसऱ्यांदा विजय मिळवून या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी खोपडे यांच्याक डे आहे. दुसरीकडे सलग दोन वेळा या मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाल्याने यावेळी पक्षाने हजारे यांच्या रूपात नवीन चेहरा खोपडेंविरुद्ध दिला आहे. काँग्रेस नेते व माजीमंत्री सतीश चतर्वेदी यांचे कट्टर समर्थक म्हणून हजारे यांची ओळख आहे. या मतदारसंघातून चतुर्वेदी चार वेळा विजयी झाले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु त्यांना आता पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. पक्षाची बांधणी, लोकसभेतील मताधिक्य, लोकसंपर्क आणि विकास कामांबाबत असलेली तळमळ, स्मार्ट सिटी, सिम्बॉयसिस आणि इतरही मोठय़ा प्रकल्पांची या मतदारसंघात झालेली सुरुवात या बाबी कृष्णा खोपडे यांच्या जमेच्या तर ‘अन्टीइन्कम्बसी’ आणि पक्षातील गटबाजी या बाबी त्यांच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. भांडेवाडी प्रकल्प, स्मार्टसिटी प्रकल्प बाधितांचा मुद्दा त्यांच्या विरोधात जाणारा आहे. २०१४ मध्ये खोपडे यांनी गडकरी मुख्यमंत्री व्हावे म्हणून मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी नागपुरात येऊनही खोपडेंच्या प्रचारार्थ सभा घेतली नाही. गडकरी यांनी मात्र दोन सभा घेतल्या.

काँग्रेसचे हजारे दोन वेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले. त्यांचा एका भागात दांडगा

जनसंपर्क आहे. चतुर्वेदी त्यांच्यासोबत आहेत शिवाय समाज आणि काँग्रेसची पारंपरिक मते या बाबी त्यांच्या जमेच्या आहे. मरगळलेली पक्ष संघटना, पक्षातील अंतर्गत गटबाजी, संपूर्ण मतदारसंघाशी नसलेली ओळख या बाबी त्यांच्यासाठी अडचणीच्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे खोपडे यांनी काँग्रेसचे अभिजित वंजारी यांचा पराभव केला होता. बसपाचे सागर लोखंडे आणि वंचितचे मंगलमूर्ती सोनकुसरे रिंगणात आहेत. या दोघांमध्ये दलित मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

एकूण मतदार –

  • ३ लाख ७० हजार ८८२
  • एकूण उमेदवार – ०८
  • २०१४ चा कौल
  • कृष्णा खोपडे (भाजप)-  ९९ हजार १३६
  • अभिजित वंजारी (काँग्रेस)- ५० हजार ५२२
  • दिलीप रंगारी  (बसपा)- १२ हजार १६४