20 January 2020

News Flash

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उभा करण्याचे राजकारण बंद करा – केजरीवाल

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारने दोनशे युनिट वीज मोफत दिली आहे

 

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उभा करण्याचे राजकारण काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे आहे. त्यामुळेच आम्ही दिल्लीत जे पाच वर्षांत करू शकलो ते ७० वर्षांत महाराष्ट्रात झाले नाही. ३५ वर्षांपासून गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. सर्वाना पैशाचा मोह असल्यामुळेच हा सर्व प्रकार झाला आहे. तेव्हा पैसा व सत्तेच्या मोहाचे राजकारण बंद करा, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

ब्रम्हपुरी येथे आपच्या उमेदवार अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रीती मेमन शर्मा, देवेंद्र वानखेडे, जगजीतसिंग, सुनील मुसळे व उमेदवार अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी उपस्थित होते.

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारने दोनशे युनिट वीज मोफत दिली आहे. सरकारी शाळा अद्ययावत करून खासगी शाळांना लगाम लावला आहे. सरकारी दवाखान्यात १० लाखापर्यंतची कोणतीही शस्त्रक्रिया नि:शुल्क केली जात असून सरकारी दवाखान्यांमध्ये अद्ययावत यंत्रसामुग्री लावण्यात आली आहे. २० हजार लिटर पाणी मोफत दिले जात आहे. जे आम्ही पाच वर्षांत केले ते महाराष्ट्रात ७० वर्षांनंतरही होऊ शकत नाही, जे दिल्लीत जमलं ते महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न केजरीवाल यांनी याप्रसंगी उपस्थित केला. केजरीवाल म्हणाले, दिल्लीच्या जनतेला जात प्रमाणपत्र, राशनकार्ड व अन्य सरकारी कामकाजासाठी कार्यालयात जावे लागत नाही तर एका फोनद्वारे घरी कर्मचारी व अधिकारी जाऊन ते काम पूर्ण करून देत असतात. महाराष्ट्रात हे का होत नाही, कारण सत्ताधाऱ्यांची नीती भ्रष्ट आहे. आपण आपल्या जुन्या पक्षाला बाजूला ठेवून परिवाराची चिंता न करता आपला मत देऊन हे चित्र बदलवा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. सभेचे संचालन विजय सिद्धावार  यांनी केले, तर आभार अमित राऊत यांनी मानले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी केली असता जनसमुदायांनी टाळय़ा वाजवून त्याला होकार दिला.

First Published on October 19, 2019 4:08 am

Web Title: vidhan sabha election congress bjp power akp 94
Next Stories
1 बुलढाणा जिल्हय़ातील तुल्यबळ लढतीत जातीय समीकरणे महत्त्वाची
2 राजकीय घराण्यांचे वारसदारच उमेदवार
3 अकोल्यात जातीय समीकरण निर्णायक
Just Now!
X