|| भक्ती बिसुरे

व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेला चारू सध्या वडील दत्ता बहिरट यांच्या प्रचाराची धुरा सांभाळतोय. दत्ता बहिरट शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार, नगरसेवक आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बहिरट माजी नगरसेवक असून विधानसभेची निवडणूक लढवताना प्रचाराचं नेतृत्व बहिरट यांचा पुत्र चारू करतोय. केवळ चारूच नव्हे, तर बहिरट यांची पत्नी, कन्या आणि सर्व नातेवाईक प्रचारात सक्रिय आहेत.

चारू सांगतो,की शिवाजीनगर परिसरात जवळचे, दूरचे असे आमचे कुटुंबीयच किमान काही हजार आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने किमान पाच मतदारांपर्यंत पोहोचावं अशा प्रकारे नियोजन करण्यात आलं आहे. दुसऱ्या दिवशीच्या प्रचाराचं संपूर्ण नियोजन आदल्या दिवशी करून त्याप्रमाणे सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जातात. आई, पत्नी आणि बहीण तसेच इतर नातेवाईक महिला विविध वयाच्या महिला मतदारांची भेट घेत आहेत. व्यवसायाने डेंटिस्ट असलेली माझी बहीणसुद्धा प्रॅक्टिस मधून ब्रेक घेऊन प्रचारात सक्रिय झाली आहे.

समाज माध्यमांवर प्रचार केला नाही, तर सद्य:स्थितीत प्रचार अपूर्ण ठरतो असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. चारूदेखील ही वस्तुस्थिती ओळखून समाज माध्यमांवरच्या प्रचारावर लक्ष केंद्रित करत आहे.

समाज माध्यमातल्या प्रत्येक व्यासपीठावर प्रचाराची माहिती, पदयात्रा, बैठका आणि सभांचे अपडेट्स दिले जातात. बहिरट यांनी केलेल्या कामाचे तपशील सुद्धा समाज माध्यमांवरून मतदारांपर्यंत पोहोचवले जातात. मध्यमवयीन पुरुष आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याबरोबरच तरुण मतदारांपर्यंत पोहोचणं हे देखील महत्त्वाचं आहे. तरुण मतदारांशी वडिलांचा संपर्क उत्तम असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी देखील स्वतंत्र वेळ दिला जात आहे,असंही चारू सांगतो.