News Flash

जिल्ह्य़ात तिरंगी, चौरंगी लढती

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघात छाननी प्रक्रियेत ३१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते.

(संग्रहित छायाचित्र)

काही जागांवर बंडखोरी कायम; १५ मतदारसंघात १४८ उमेदवार; ७२ अपक्षांचा समावेश

बंडखोरांना शांत करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत चाललेले प्रयत्न काही ठिकाणी यशस्वी ठरले तर काही मतदारसंघात मात्र त्यास अपयश आले. यामुळे नाशिक पश्चिमसह काही जागांवर बंडखोरांचे आव्हान कायम राहिले. नाशिक पूर्वमध्ये काँग्रेस आघाडीसाठी मनसेच्या उमेदवाराने माघार घेतली. जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघात ६४ उमेदवारांनी माघार घेतली. आता रिंगणात १४८ उमेदवार असून त्यात ७२ अपक्षांचा समावेश आहे. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक १९, तर दिंडोरीत सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार आहेत. अनेक मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार असल्याचे चित्र आहे.

माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर मतदारसंघनिहाय अंतिम चित्र स्पष्ट झाले. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघात छाननी प्रक्रियेत ३१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. यामुळे रिंगणात २१२ उमेदवार होते. सेना-भाजपमध्ये जागा वाटपावरून मतभेद होते. त्याचे प्रतिबिंब बंडखोरीत उमटले. ज्या जागेवर सेनेचा दावा होता, ती जागा भाजपला मिळाल्याने सेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी केली. ज्या जागांवर भाजपचा दावा होता, तिथे भाजप पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले. मतविभाजन टाळण्यासाठी बंडखोरांना शांत करणे गरजेचे होते. त्याकरिता सलग दोन दिवस प्रयत्न करण्यात आले. माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर मतदारसंघनिहाय चित्र स्पष्ट झाले आहे. १५ मतदारसंघात मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांचे एकूण ५३ उमेदवार रिंगणात आहेत. मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांची संख्या २३ असून उर्वरित ७२ अपक्षांनी मैदानात उडी घेतली आहे. नांदगावमध्ये सर्वाधिक १३ उमेदवारांनी माघार घेतली. मालेगाव मध्यमध्ये एक, मालेगाव बाह्य़ दोन, बागलाण नऊ, कळवण दोन, चांदवड पाच, येवला सहा, सिन्नर एक, निफाड आणि दिंडोरी प्रत्येकी तीन, नाशिक पूर्व दोन, नाशिक पश्चिम १०, देवळाली चार, इगतपुरी मतदारसंघात तीन जणांनी माघार घेतली.

सर्वपक्षीयांकडून बंडखोरांच्या माघारीसाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करण्यात आले. नाशिक पूर्व मतदारसंघात नाटय़मय घडामोडी घडल्या. मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. या मतदारसंघात काँग्रेस आघाडी आणि मनसे यांची अनोखी युती आकारास आली. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार गणेश उन्हवणे यांच्या माघारीसाठी प्रयत्न झाले. परंतु, त्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. नाशिक पश्चिममध्ये महायुतीतर्फे सीमा हिरे, सेना बंडखोर विलास शिंदे, मनसेचे दिलीप दातीर, राष्ट्रवादीकडून अपूर्व हिरे, माकपचे डॉ. डी. एल. कराड या मुख्य उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. नाशिक मध्य मतदारसंघात कोणीही माघार घेतली नाही. या जागेवर महायुतीच्या देवयानी फरांदे, आघाडीच्या डॉ. हेमलता पाटील, मनसेचे नितीन भोसले या प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होईल. देवळाली मतदारसंघात चार जणांनी माघार घेतली. या मतदारसंघात महायुतीचे योगेश घोलप, आघाडीच्या सरोज आहिरे यांच्यात मुख्य लढत होईल. दिंडोरी मतदारसंघात सेना बंडखोर रामदास चारोस्कर आणि धनराज महाले यांनी माघार घेतली. या जागेवर राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ तर शिवसेनेचे भास्कर गावित यांच्यात होणार आहे.

बंडखोरांना रोखण्यात सेनेला अपयश

नाशिक पश्चिम मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्यासमोर सेनेचे महापालिकेतील गटनेते विलास शिंदे यांची बंडखोरी कायम राहिली. या जागेवरून सेना-भाजपमध्ये कमालीचे वाद होते. ही जागा भाजपला दिल्याने सेनेच्या शिंदे यांच्यासह सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या भागात सेनेचे २२ नगरसेवक आहेत. सेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी बंडखोरांशी चर्चा करून त्यांना माघार घ्यायला सांगितले गेल्याचे नमूद केले. परंतु, शिंदे यांनी अखेपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. ठाकरे, बडगुजर यांनी माघार घेतली. शिंदे हे सेना नेत्यांना सापडले नाहीत. सेना नऊ जागा लढवत आहे. चार जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे. युती धर्म पाळून शिवसेना बंडखोरांना अर्ज मागे घ्यायचे निर्देश दिले. परंतु, काही ठिकाणी सेनेला अपयश आले.

अपक्षांचे उदंड पीक

जागा वाटपावरून झालेल्या कलहाची परिणती अपक्षांची संख्या वाढण्यात झाल्याचे दिसत आहे. नांदगाव आणि नाशिक पश्चिम या मतदारसंघात प्रत्येकी ११ अपक्ष उमेदवार आहेत. मालेगाव मध्यमध्ये १०, मालेगाव बाह्य़मध्ये सहा, बागलाण, सिन्नर आणि येवल्यात प्रत्येकी तीन, कळवण आणि निफाड मतदारसंघात प्रत्येकी एक, चांदवड, नाशिक मध्य, देवळाली आणि इगतपुरीत प्रत्येकी चार अपक्ष उमेदवार नशीब अजमावत आहेत. जिल्ह्य़ात दिंडोरी हा एकमेव मतदारसंघ असा आहे की, तिथे एकही अपक्ष उमेदवार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 12:58 am

Web Title: vidhan sabha election congress mns akp 94
Next Stories
1 झेंडुचा भाव वधारला
2 शहरातील पाच लाख मतदार  आरक्षण विरोधात ‘नोटा’ वापरणार
3 मतदानाविषयी विद्यार्थ्यांकडून जनजागृती
Just Now!
X