शिवसेनेचा एकमेव बंडखोर रिंगणात; महायुती, आघाडी, मनसे उमेदवारांमध्ये लढती

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे बंड सोमवारी अपेक्षेप्रमाणे शमले. आघाडी-युतीच्या नेत्यांनी मनधरणी करत आणि आश्वासने दिल्यानंतर या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून महायुती, आघाडी आणि मनसेच्या उमेदवारांमध्ये आठ मतदारसंघात लढती होणार आहेत.

उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे कारण पुढे करून काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी केली होती. शहरातील पाच मतदारसंघात बंडखोरी झाली होती. या बंडोबांची मनधरणी करून त्यांना शांत करण्याचे नाना तऱ्हेचे प्रयत्न महायुती आणि आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी केले. त्याला अपेक्षित यश आले. त्यामुळे शिवसेनेचे खडकवासल्यातील बंडखोर रमेश कोंडे, वडगांवशेरीतील संजय भोसले, हडपसरमधून गंगाधर बधे, पुणे कॅन्टोन्मेंटमधून पल्लवी जावळे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. कसब्यातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

आघाडीतील काँग्रेस बंडखोरांपैकी पर्वतीमधून नगरसेवक आबा बागुल, पुणे कॅन्टोन्मेंटमधून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, कसब्यातून माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अर्ज मागे घेत अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दर्शविला आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमधून भाजपच्या माजी नगरसेविका कविता वैरागे यांचे पती भरत वैरागे यांचीही समजूत काढण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारांनीही सुस्कारा सोडला असून बंडखोरांनी अपेक्षित माघार घेतल्यामुळे निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाले आहे. सेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारापुढील आव्हान वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे या बंडखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट इशारा दिला होता. त्यानुसार शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेत भाजप उमेदवाराच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वती मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. बागुल यांच्यावरील अन्याय दूर करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. त्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतला. सदानंद शेट्टी आणि कमल व्यवहारे यांनीही पक्ष नेतृत्वाबरोबर झालेल्या चर्चेनुसार माघार घेतली.

माघार घेणारे बंडखोर

शिवसेना

खडकवासला- रमेश कोंडे, वडगाव शेरी- संजय भोसले,  कॅन्टोन्मेंट- पल्लवी जावळे, हडपसर- गंगाधर बधे

 काँग्रेस

पर्वती- आबा बागुल, कसबा- कमल व्यवहारे, कॅन्टोन्मेंट- सदानंद शेट्टी

 भाजप

पुणे कॅन्टोन्मेंट- भरत वैरागे

कसबा- विशाल धनवडे, शिवसेना यांची बंडखोरी कायम

बंडखोरी मागे; पण प्रचाराचे काय?

उमेदवार, स्थानिक नेते आणि पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाप्रमाणे शिवसेना आणि काँग्रेस बंडखोरांनी माघार घेतली आहे. महायुती, आघाडीच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. मात्र हे आश्वासन पाळले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि अन्याय होत असल्याच्या भावनेतून उमेदवारांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे छुप्या पद्धतीने अधिकृत उमेदवारांविरोधातच प्रचार होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

‘कसब्यात भगवा फडकविणार’

कसबा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक विशाल धनवडे यांची बंडखोरी कायम राहिली आहे. कसब्यात शिवसेनेचा भगवा फडकवेन आणि मग मातोश्रीची पायरी चढेन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र भाजपची या मतदारसंघातील ताकद लक्षात घेता आणि शिवसेनेकडूनही भाजप उमेदवाराला पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांच्यापुढील आव्हान खडतर असणार आहे.