जिल्ह्यतील सहाही मतदारसंघांत बसपा, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि काँग्रेस आघाडी यांच्यात सत्तासंघर्ष होणार असल्याचे दिसत असतानाच वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी या आंबेडकरी विचारधारेच्या प्रवाहातील पक्षांनी पालघर जिल्ह्यतील सहाही विधानसभा मतदारसंघांत स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे दलित मतांचे मोठय़ा प्रमाणात ध्रुवीकरण होऊन महायुती आणि काँग्रेस आघाडी यांच्यातील सत्तासंघर्षांची चुरस वाढण्याचे संकेत व्यक्त होत आहेत.

भारीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या वर्षी बहुजनांना एका झेंडय़ाखाली आणण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रातील ४८ पैकी ४७ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, सर्वच जागांवर आघाडीला अपयश आले. तरीही त्यांना मिळालेली मतांचे टक्केवारी दखलपात्र ठरली होती. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेच्या पालघर जिल्ह्यातील सर्व जागांवर आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बहुजनांचा कैवार घेणाऱ्या बहुजन समाज पार्टीनेही पालघर जिल्ह्यात सहाही जागांवर उमेदवार उभे केल्यामुळे यावेळच्या लढतीत अधिकच रंगत आणली आहे. उभय पक्ष बहुजनांच्या मतांवर दावा करत असले तरी काही ठिकाणी स्थानिक पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे आणि या स्थानिक पक्षांना मानणाऱ्या दलितांची संख्याही मोठी आहे. यावेळच्या निवडणुकीत दलित मतांचे मोठय़ा प्रमाणात ध्रुवीकरण होऊन त्याचा निकालावर परिणाम होणार आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हा पक्ष महायुतीसोबत आहे. रामदास आठवले यांचे संघटन कौशल्य आणि त्यांच्या प्रभावाचा फायदा करून दलित मतांचा ओघ खेचून आणण्यासाठी महायुतीचे नेते विविध डावपेच खेळत आहेत. तर महाआघाडीही प्रा. जोगेंद्र कवाडे आणि रा. सु. गवई यांच्या प्रभावाखालील दलित मतदारांना आकर्षून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

बोईसर : प्रा. रजेसिंग कोळी

नालासोपारा : प्रवीण गायकवाड

वसई : शाहीद शेख

विक्रमगड : संतोष वाघ

पालघर : विराज गडग

डहाणू : शिलानंद काटेला

बहुजन समाज पार्टीचे उमेदवार

बोईसर : सुनील गुहे

नालासोपारा : सलमान बलोच

वसई : अंतोन डिकुन्हा

विक्रमगड : संजय घाटाळ

पालघर : सुरेश जाधव

डहाणू : राजेश दुमाडा

गेल्या तीस वर्षांपासून बहुजन समाज पार्टी राजकारणात सक्रिय आहे. बहुजनांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी आमचा पक्ष काम करत आहे. बहुजनांनीच आम्हाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली आहे. बहुजनांच्या हक्काची लढाई आम्ही लढत आहोत. त्यामुळे यावेळीही बहुजन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. काही नेते कपडे बदलावेत त्याप्रमाणे पक्ष बदलतात किंवा स्थापन करतात. बहुजन अशांच्या मागे जाणार नाहीत.

– विनोद तांबे, वसई विधानसभा प्रभारी, बहुजन समाज पार्टी