|| नितीन पखाले

बहुरंगी, चौरंगी, तिहेरी आणि दुहेरी लढत:- यवतमाळ जिल्ह्यत सध्या पाच भाजप आणि प्रत्येकी एक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्षीय बलाबल आहे. जिल्ह्यत कुठे बहुरंगी, कुठे तिहेरी तर कुठे दुहेरी लढत होणार हे स्पष्ट आहे. बंडखोरांचे आव्हान, बदललेले उमदेवार, दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावर शेतकरी, व्यापारी, कर्मचाऱ्यांसह सामान्यांसमोरील आर्थिक अडचणी या अनुषंगाने निवडणुकीनंतरचा ‘निकाल’ कसा राहील, याबाबत मतदारांमध्येउत्सुकता दिसून येते.

यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी, उमरखेड हे पाच मतदारसंघ भाजपच्या ताब्यात तर दिग्रस शिवसेनेच्या तर पुसद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. भाजप आणि शिवसेनेला यवतमाळ, वणी, दिग्रस, उमरखेड व आर्णी या मतदारसंघात बंडखोर उमदेवारांनी आव्हान निर्माण केले आहे. कालपर्यंत बंडखोरांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल म्हणणारे भाजप, शिवसेनेचे नेते बंडखोरांमुळे हतबल झालेले दिसत आहेत.

दिग्रसमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमदेवार माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी शिवसेनेचे संजय राठोड यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. येथे राष्ट्रवादीचे तारीक लोखंडवाला हेही रिंगणात आहेत. मात्र लढत शिवसेना विरुद्ध भाजप बंडखोर अशीच आहे. या मतदारसंघात निवडणूक जातीय, राजकीय वर्चस्वाच्या समीकरणांवर आली आहे.

यवतमाळ मतदारसंघात भाजप, काँग्रेस, प्रहार आणि बंडखोर अपक्ष असे चौरंगी लढतीचे चित्र आहे. भाजपचे मदन येरावार यांच्यापुढे शिवसेनेचे बंडखोर उमदेवार संतोष ढवळे यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. अपक्ष ढवळेंनी शिवसेना नेत्यांचेही आदेश धुडकावून लावल्याने महायुतीच्या नेत्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी गेल्या ३० वर्षांचा राजकीय अनुभव आणि संपर्काच्या जोरावार यवतमाळ मतदारसंघात अपेक्षित वातावरण निर्मिती केली आहे. प्रहारचे बिपीन चौधरी हे युवा उमेदवार शहरी व ग्रामीण भागात तरुणांची गर्दी जमवण्यात यशस्वी झाले आहेत.

वणी मतदारसंघात निवडणूक बहुरंगी आहे. भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार, काँग्रेसचे वामनराव कासावार, मनसेचे राजू उंबरकर, शिवसेना बंडखोर माजी आमदार विश्वास नांदेकर, सुनील कातकडे, राष्ट्रवादी बंडखोर व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. महेंद्र लोढा, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष परंतु आता कोणत्याही पक्षात नसलेले अपक्ष संजय देरकर अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र खरी लढत भाजप व काँग्रेसच्या उमेदवारातच होणार आहे.

विद्यमान भाजप आमदार राजू तोडसाम यांनी बंडखोरी केलेल्या आर्णी मतदारसंघात तिहेरी लढत आहे. भाजपचे डॉ. संदीप धुर्वे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव मोघे आणि बंडखोर अपक्ष राजू तोडसाम यांच्यात लढत आहे. तोडसाम यांच्यावर भाजपने कारवाई केली असली तरी मतदारसंघातील आदिवासी समाज विभागला गेल्याने त्याचा फटका भाजप उमदेवारालाच बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवाय मतदारसंघात ‘मालकशाही’ नको असा सूर जनतेतून व्यक्त होत आहे. भाजपच्या या अंतर्गत कलहाचा फायदा येथे काँग्रेस कशी करून घेते, यावरच निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

उमरखेड मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच मुख्य लढत आहे. मात्र शिवसेना बंडखोर उमदेवार डॉ. विश्वनाथ विणकरे यांनी लढतीत काहीशी रंगत आणली आहे. भाजपने विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांना डावलून येथे नामदेव ससाणे हे नवीन उमदेवार दिले. नजरधने यांना शांत करण्यात भाजपला यश आले असले तरी ते आपल्यावरील अन्यायाचा योग्य मार्गाने बदला घेण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेला गर्दी व्हावी म्हणून मतदारसंघातील बचत गटांच्या महिलांना भाजपने थाप देऊ न आणल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया येथे उमटत आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वातील भांडणात काँग्रेसचे विजय खडसे यांना ही वाट सध्यातरी अवघड दिसत नाही.

पुसद विधानसभा मतदारसंघात नाईक घराण्यातील दोन सख्खे चुलत बंधूच निवडणूक रिंगणात असल्याने या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मनोहर नाईक त्यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील नाईक यांच्या विजयासाठी ‘बंगल्यातून’ सर्व सूत्रे हलवत आहेत. त्या तुलनेत भाजपचे उमेदवार आ. नीलय नाईक यांना पक्षाने ऐनवेळी रिंगणात उतरवल्याने गावागावातील मतदारांपर्यंत थेट संपर्क साधण्यात त्यांना मर्यादा पडत आहेत. त्याचाच फायदा सतत लोकांच्या गराडय़ात राहणारे मनोहर नाईक आपल्या मुलासाठी घेत आहेत. येथे मनसेचे अभय गडम हे सुद्धा रिंगणात आहेत. मात्र खरी लढत दोन नाईकांमध्येच आहे. राळेगावमध्ये भाजपचे डॉ. अशोक उईके आणि काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांच्यात दुहेरी लढत आहे. येथे प्रहारचे गुलाब पंधरे आणि वंचितचे माधव कोहळे हेही रिंगणात आहेत. मात्र भाजप आणि काँग्रेसमध्येच तुल्यबळ लढत होत आहे.