गणेश नाईक, भाजप, ऐरोली मतदारसंघ

नवी मुंबई पालिका स्थापनेपासून तीन पक्षांच्या माध्यमातून पालिकेत सत्ता ताब्यात ठेवणारे माजी मंत्री गणेश नाईक यांची नवी मुंबईवर गेली तीस वर्षे हुकूमत आहे. साधे ग्रामपंचायतीचे सदस्य न राहिलेले नाईक १९९५ मध्ये थेट राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले. तेव्हापासून ‘नवी मुंबई म्हणजे नाईक आणि नाईक म्हणजे नवी मुंबई’ असे एक राज्यात समीकरण निर्माण झालेले आहे. त्याच नाईकांच्या पहिल्या बेलापूर मतदारसंघाची पाच मतदारसंघांत विभागणी होऊन तयार झालेल्या ऐरोली मतदारसंघात मुलाच्या मतदारसंघात ते निवडणूक लढवीत आहेत. भाजप प्रवेशाचा निर्णय घेऊन नाईकांनी सर्व विरोधकांना चारीमुंडय़ा चीत केले असले तरी पक्षातील अंर्तगत कलह कायम राहणार आहे. पा पाश्र्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत..

पक्षांतराचे खरे कारण काय आहे?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि देशाचे नेते शरद पवार यांनी आपल्याला भरभरून दिलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी आहे. देशाची राजकीय सद्य:स्थिती पाहता भाजपची सत्ता विरोधकांना आता हटवणे शक्य नाही असे चित्र आहे. किंबहुना विरोधक दुर्बळ झाले आहेत. अशा वेळी राज्य व केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाची धुरा सांभाळणे शहराच्या हिताच्या दृष्टीने कधीही योग्य आणि समर्पक आहे. माझी जन्मभूमी व कर्मभूमी ही नवी मुंबई आहे. त्यामुळे विरोधक काहीही म्हणोत मी केलेले पक्षांतर हे केवळ शहराच्या हितासाठी आहे.

इतकी वर्षे राजकारण करीत असताना कोणते प्रश्न प्रलंबित आहेत असे वाटते?

नवी मुंबई हे एक नियोजनबद्ध शहर आहे हे सर्वाना माहीत आहे. या ठिकाणी गटर मीटर वॉटरसारख्या प्राथमिक सुविधांचा प्रश्न नाही. पालिकेच्या माध्यमातून या शहराला एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा असल्याने प्रकल्पग्रस्त, पुनर्विकास, झोपडपट्टी विकास यांसारखे महत्त्वाचे प्रश्न न सोडविल्याची खंत आहे. येत्या काळात हे प्रश्न  निकाली काढले जाणार आहेत.

नवी मुंबईतील राजकारणाची नवीन दिशा काय राहणार आहे?

भाजपची निर्विवाद सत्ता राहणार. भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. मी आतापर्यंत प्रादेशिक पक्षात काम केलेले आहे. त्यांनी मला ठाणे जिल्ह्य़ात पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाची पालिकेत सत्ता राबवली आहे. येथील जनतेने माझ्यावर नेहमीच विश्वास टाकला आहे. माझ्या प्रवेशाबरोबरच पालिकेत भाजपची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. ती आता कायम राहणार आहे.

  तुमची ही शेवटची निवडणूक म्हणता येईल का?

ईश्वर कृपेने मी आजही फिट आहे आणि पुढेही राहणार आहे. माझी ही शेवटची निवडणूक आहे का हे आत्ता सांगता येणार नाही. ते आपण काळावर सोडून देऊ. या शहरासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत काम करीत राहणार आहोत.

  शिवसेनेशी तुमचे संबंध कसे आहेत?

अतिशय चांगले संबध आहेत. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेलो कार्यकर्ते आहोत. अनेकांना ही गोष्ट माहीत नाही की साहेबांच्या शेवटच्या काळात मी त्यांच्या संपर्कात होतो. माझा गणेश हे त्यांचे शब्द आजही माझ्या कानात घुमतात. २० वर्षांनंतर शिवसैनिकांना मला मतदान करण्याची संधी मिळाली असल्याने माझे जुने सहकारी सध्या खूश आहेत.

तुमच्याच पक्षातील ज्येष्ठ आमदार म्हात्रे यांच्याबद्दल काय मत?

मला या विषयावर जास्त बोलायचं नाही, पण त्या पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांचा विजय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्याबरोबर भाजपत प्रवेश करणारे सर्वाधिक नगरसेवक त्यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यांना त्यांचे काम करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.

मुलाखत: विकास महाडिक