|| प्रशांत देशमुख

अनपेक्षित निकाल देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या हिंगणघाट मतदारसंघात सहकार गटाचा पाठिंबा निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.  शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचा पराभव करीत ‘जायंट किलर’ म्हणून प्रसिद्धी मिळवलेले शिवसेना उपनेते अशोक शिंदे यांची बंडखोरी चर्चेत आली आहे. भाजपचे आमदार समीर कुणावार व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे व शिंदे अशा तिहेरी लढतीत राष्ट्रवादीचे सहकार नेते अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या छुप्या पाठिंब्याची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

अ‍ॅड. कोठारी इच्छुक होते. परंतु तिकीट न मिळाल्याने त्यांच्या गटाची भूमिका तिमांडे यांच्या विरोधात गेली. त्यातच पक्षनेते शरद पवार यांच्या सभेस तिमांडे यांनी निमंत्रण न दिल्याने हा गट संतप्त झाला. या पाश्र्वभूमीवर कोठारी गटाने बुधवारी पाठिंब्याबाबत चर्चा केली. त्यात दुफळी दिसून आली. शिंदे की कुणावार यात निर्णय न लागल्याने कोठारी यांनी याबाबत भूमिका घेण्याचा निर्णय सहकाऱ्यांवर सोडून दिला.

समुद्रपूर व हिंगणघाट बाजार समिती, वणा बँकेचे जाळे व गावपातळीवर असणारे पक्षीय पदाधिकारी ही कोठारी गटाची ताकद. यापूर्वीच्या तिमांडे व कोठारी यांचे मतभेद झाले. कोठारींच्या मदतीशिवाय तिमांडे प्रथमच रिंगणात असून या पाठिंब्याअभावी त्यांची  स्थिती नाजूक असल्याची चर्चा आहे. कोठारी आपल्यालाच पाठिंबा देतील, असा शिंदे व कुणावार गटाचा विश्वास आहे. जातीय ध्रुवीकरणात कुणावार व तिमांडे यांच्यात मतविभागणी अटळ आहे. त्याचा फायदा शिंदे यांना होण्याची शक्यता व्यक्त आहे. तीनवेळा आमदार राहिलेल्या शिंदेंना तिकीट न मिळाल्याने करावी लागलेली बंडखोरी सहानुभूतीची लहर निर्माण करण्याची शक्यता व्यक्त होते. पक्षाने त्यांचे निलंबन केलेले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील शिवसैनिक हिंगणघाटात जमा झाले आहेत. त्यातच कोठारी गटाचा छुपा पाठिंबा शिंदे गटाने गृहीत धरल्याने कुणावार यांच्यापुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.