01 June 2020

News Flash

निम्मे मतदार घरीच!

बेलापूर मतदारसंघात सकाळी पावसामुळे मतदानात उत्साह पाहायला मिळाला नाही

ऐरोली, बेलापूरकरांची मतदानाकडे पाठ; उरणमध्ये मात्र दांडगा उत्साह

नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण मतदारसंघातील शहरी भागांत मतदानाचा टक्का घटला. उरण आणि पनवेल मतदारसंघातील ग्रामीण भागांत मतदारांनी उत्साह दाखवला. सोमवारी सकाळी पाऊस आणि दुपारी उन्हाचा तडाखा वाढला असताना मतदारांचा उत्साह मावळलेला दिसला. सायंकाळपर्यंत बेलापूरमध्ये ४४ टक्के, ऐरोलीत ४२, पनवेल ४८ आणि उरणमध्ये ७३ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. चारही मतदारसंघांत किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.

बेलापूर मतदारसंघात सकाळी पावसामुळे मतदानात उत्साह पाहायला मिळाला नाही. मतदान सुरू झाल्यानंतर सकाळी ७ ते ९ या वेळेत निरुत्साह पाहायला मिळाला. सकाळी ९ वाजेपर्यंत पाचच टक्के मतदान झाले. बेलापूर मतदारसंघात मतदानांसह इतर घटनांचीही नोंद झाली. शनिवार आणि रविवारी झालेल्या रिपरिप पावसामुळे बेलापूर मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी मंडपातील मतदान कक्षाभोवती पावसामुळे चिखल झाला होता. त्यामुळे अनेक मतदान ठिकाणी ग्रीट टाकण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

राज्यात सर्वाधिक साक्षर असलेल्या नवी मुंबईच्या मतदारांमध्ये म्हणावा तितका उत्साह दिसून आला नाही. दुपारी तीन वाजेपर्यंत ऐरोली मतदारसंघात केवळ २९ टक्के मतदान झाले होते. सलग दोन दिवस पाऊस आणि सोमवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. सुरुवातीला मतदानाचा टक्का कमी होता. सकाळी दहानंतर मतदानाचा टक्का वाढेल, अशी शक्यता होती, तरीही मतदार बाहेर पडले नाहीत. बहुतांश मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. कोपरखैरणेतील पालिका शाळा, रा. फ. नाईक शाळा, घणसोली घरौंदा ऐरोली सेक्टर- ८ येथील सरस्वती शाळा केंद्रांवर मतदारांनी उत्साह दाखवला.

तळोजा येथील कमळ गौरी विद्यालयातील केंद्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि मतदान पावत्या १९ मतांच्या नोंदणीनंतर बंद पडले. येथील निवडणूक निरिक्षक प्रदीप कांबळे यांनी तातडीने हे यंत्र बदली करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत नागरिकांची रांग वाढली होती. मात्र अर्धातासानंतर नवीन इव्हीएम यंत्राने मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. काळुंद्रे गावात काही काळासाठी मतदान यंत्र बंद होते. मात्र अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केल्यानंतर येथेही यंत्र पुन्हा सुरू करण्यात आले.

पनवेल शहरातील मतदारांना आवाहन करण्यासाठी निवडणूक आयोगाने वि. खं. विद्यालयात सेल्फी पॉइंट उभारला होता. मी केलंय, तुमचं काय, असा आशय त्यावर ठळक शब्दांत लिहिलेला होता. या खिडकीत सेल्फी काढून समाजमाध्यमांवर पसरविण्यात आले. सकाळच्या सत्रात आठ वाजेपर्यंत पनवेल शहरातील गुजराती शाळेत भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला.

उरण विधानसभा मतदारसंघात सकाळी मतदान केंद्रांवर मतदारांना तुरळक रांगा होत्या. ग्रामीण भागांत मतदारांचा काही प्रमाणात उत्साह दिसून आला.  शहरी भागात मात्र निरुत्साह दिसून आला. कामगार वसाहतींमध्ये हे चित्र कायम होते. दुपारी तीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते.

जासई, चिरनेर तसेच कोप्रोली आदी ग्रामीण भागातील केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजेपर्यंत उरण विधानसभा मतदार संघात ६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. उरण शहरातील काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्रे तसेच मतदान पावती यंत्रणा बंद पडल्याच्या घटना घडल्या. मात्र अतिरीक्त मशीन तातडीने बदलण्यात आल्या. मतदानात अनेक ठिकाणी महिलांची संख्या अधिक होती. ज्येष्ठ नागरीक,आदिवासी,कामगार अशा सर्व स्तरातील मतदार मतदान करण्यासाठी येत होते. जासई येथील खास महिलांसाठी सखी मतदान केंद्र उभारण्यात आलेले होते. या मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर सेल्फी काढण्याची सोय करण्यात आलेली होते. अनेक ठिकाणी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची,व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती.

पोलीस पावसात

पाऊस सुरू होता. त्याचा फटका पोलिसांना बसला.  शेकाप व आघाडीचे उमेदवार हरेश केणी यांनी सपत्नीक पेठार्ली गावातील जिल्हापरिषदेच्या विद्यालयात जाऊन आठ वाजता निवडणूकीचा हक्क बजावला. नवीन पनवेल शहरातील सेक्टर १८ येथील ९१ वर्षीय एका जेष्ठ नागरिक महिलेने आपल्या कुटूंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी अकरा वाजेपर्यंत १५.४७ टक्के मतदान झाले. मतदारांचा निरुत्साह याच दरम्यान राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या ध्यानात येण्यास सूरुवात झाली होती. सायंकाळपर्यंत ४८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

आधी कर्तव्य

खारघर येथे राहणारे आणि पनवेलच्या महसूल विभागात काम करणारे संदीप रोडे हे मंडळ अधिकारी त्यांची नेमणूक निवडणूक आयोगाने पनवेलमध्ये लावली होती. रोडे यांचे चुलते शशिकांत हे अलिबाग येथे राहतात. ६२ वर्षीय शशिकांत यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. रविवारी उशीरापर्यंत रोडे हे कामातच व्यग्र होते. त्यांचा मोबाइलची बॅटरी संपल्याने त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. सकाळी पावणेसात वाजता संदीप यांचा मोबाइल पुन्हा सुरू  झाल्यावर ही बातमी कळाली. परंतु संदीप यांनी अंत्यसंस्काराला जाण्याऐवजी राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:53 am

Web Title: vidhan sabha election heavy rain akp 94
Next Stories
1 कमी मतदानामुळे प्रमुख उमेदवारांना चिंता
2 मतदानापर्यंत समाजमाध्यमांवर बिनबोभाट प्रचार
3 मतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती
Just Now!
X