जिल्ह्यतील अनेक रस्त्यांवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस असल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांनी जिल्ह्य़ात ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. या शक्तिप्रदर्शनामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन सलग दुसऱ्या दिवशीही कोंडी झाली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे, ओवळा-माजिवाडा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण, ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, कळवा-मुंब्रा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुका काढल्या होत्या. या मिरवणुकांच्या माध्यमातून केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली. वागळे इस्टेट भागातील किसननगर, इंदिरानगर, श्रीनगर, रस्ता क्रमांक १६ याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नौपाडय़ातील गोखले रोड, हरिनिवास, तीन पेट्रोलपंप, राम मारुती रोड, स्थानक परिसर, तलावपाळी, टेंभीनाका, जिल्हाधिकारी परिसर या भागांत वाहतूक कोंडी झाली होती. तसेच पोखरण रोड आणि मुंब्रा परिसरातही कोंडी झाली होती. या कोंडीचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागला.

भिवंडी शहरात अशाच प्रकारे कोंडी झाली होती. कल्याण, डोंबिवलीत शुक्रवारी भाजपमधील नाराज तसेच मनसेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्यात आल्याने सलग दुसऱ्या दिवशीही शहरात विविध रस्त्यांवर कोंडी झाली होती. या कोंडीचा सर्वाधिक फटका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शुक्रवारी सकाळी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. डोंबिवली मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पश्चिमेतील गोपी मॉल येथून त्यांनी प्रचार फेरीला सुरुवात केली. या मिरवणुकीमुळे महात्मा फुले रस्ता, गुप्ते रस्ता या भागात वाहतूक कोंडी झाली होती. कल्याण पूर्वेत शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या मिरवणुकीमुळे कल्याण पूर्व भागातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ओमी कलानी यांनी शक्तिप्रदर्शन करत उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयात अर्ज दाखल केले. त्यामुळे या शहरातही वाहतूक कोंडी झाली.