निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीला जोरदार धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देत माजी महापौर, युवानेते अभिषेक कळमकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज, बुधवारी सायंकाळी झालेल्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून प्रवेश दिला. हा वाघ पिंजऱ्यात बंदिस्त होता म्हणून त्याच्यावर कोणीही वार करत होते, परंतु आता हा वाघ पिंजऱ्याच्या बाहेर आला आहे, असे सांगत कळमकर यांनी राष्ट्रवादीतील विरोधकांना आव्हान दिले. कळमकर यांनी भावनिक होत काका, माजी आमदार दादा कळमकर आपल्याला माफ करतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. शिवसेना कळमकर यांना जपून पुढे जाण्यास मदतच करेल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या नगर दौऱ्यात पक्षाचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या समर्थकांकडून कळमकर व किरण काळे या दोघांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. कळमकर हेही राष्ट्रवादीचा त्याग करुन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सोशल मिडियात सुरु होती. परंतु कळमकर स्वत: त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते. काल, मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार नगरच्या दौऱ्यावर होते. पारनेरमध्ये त्यांनी अभिषेक कळमकर यांनी पक्ष सोडू नये, यासाठी माजी आमदार कळमकर यांच्याशी चर्चाही केली. मात्र प्रत्यक्षात अभिषेक यांनी आज ठाकरे यांच्या सभेत प्रवेश केला.

सभेत खा. डॉ. सुजय विखे यांचे भाषण सुरु होते, भाषणात ते नगरचे राजकारण विचित्र आहे, शहराचे राजकारण तर कळतच नाही, असा उल्लेख करत होते, त्याचवेळी अभिषेक प्रवेशासाठी व्यासपीठाकडे आले, ते अचानक आल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला, मात्र कळमकर हे प्रवेशासाठी आले असल्याचे समजताच उपस्थितांनी जल्लोष केला. कळमकर यांचा राष्ट्रवादीत झालेला अपमान हा केवळ त्यांचाच नाही,तर नागरिकांचाही होत असतो, प्रवेशातून ही खंतच व्यक्त झाल्याचा उल्लेख खा. विखे यांनी केला.

राष्ट्रवादीत उमेदवारी मिळाली नाही, म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करतो आहे, असे नाही. माझे श्रद्धास्थान असलेले दादा गेली ४० वर्षांपासून पवारांशी एकनिष्ठ आहेत, राष्ट्रवादीकडूनही माझ्यावर अन्याय झालेला नाही. परंतु यापुढे आपले भवितव्य शिवसेनेतच राहील. प्रवेशामुळे माझ्यावर काही टीकाटिप्पणी झाली तरी शिवसैनिक मला समजून घेतील. यापूर्वी हा वाघ पिंजऱ्यात बंदिस्त होता, त्यामुळे त्याच्यावर कोणीही वार करत होते, परंतु आता हा वाघ पिंजऱ्याबाहेर आला आहे.

-अभिषेक कळमकर