लांडे, लांडगे, कलाटे यांच्या जागांची अदलाबदली

शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या वेळी (२०१४) लढलेलेच उमेदवार यंदा बदलत्या परिस्थितीत पुन्हा आमने-सामने आले आहेत. माजी आमदार विलास लांडे आणि शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे गेल्या वेळी राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हावर लढले. यंदा मात्र ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भोसरी विधानसभेतून अपक्ष निवडून आलेले आमदार महेश लांडगे यंदा भाजपच्या अधिकृत तिकिटावर लढतीत उतरले आहेत.

गेल्या वेळी, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती नव्हती. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडीही नव्हती. सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे आपापले उमेदवार रिंगणात उतरवले होते. चिंचवड मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप भाजपचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून राहुल कलाटे रिंगणात होते. तेव्हा कलाटे यांचा पराभव करून जगताप निवडून आले होते. आता जगताप त्याच पक्षातर्फे रिंगणात आहेत. तर, कलाटे यांनी शिवसेनेचे बंडखोर म्हणून शड्डू ठोकले आहेत. त्यांना इतर पक्षांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.

पिंपरी मतदारसंघात गेल्या वेळी शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे होते. तेव्हाच्या चुरशीच्या लढतीत चाबुकस्वार थोडक्यात निवडून आले होते. यंदा त्याच दोघांमध्ये नव्याने लढत होत आहे. भोसरीत गेल्या निवडणुकीत महेश लांडगे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. तर, विलास लांडे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार होते. महेश लांडगे विजयी झाले. त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. यंदाच्या निवडणुकीत लांडगे भाजपचे उमेदवार आहेत. तर, लांडे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. याशिवाय, गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार तीनही मतदारसंघात रिंगणात होते. यंदा चिंचवड व भोसरीत राष्ट्रवादी व काँग्रेसचा उमेदवार नाही. त्यांनी अपक्ष  व बंडखोराच्या मागे राहण्याची भूमिका घेतली. तर, पिंपरीत राष्ट्रवादीचा उमेदवार असून काँग्रेसकडून झालेली बंडखोरी मागे घेण्यात आली आहे.