नेत्यांकडून मनधरणीनंतर बेलापूर, उरणमध्ये आव्हान

विधानसभेच्या ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे निशाण फडकावणाऱ्यांनी अपेक्षेप्रमाणे नंतर माघारही घेतली. त्यामुळे युतीतील असंतुष्टांची समस्या नेत्यांनी केलेल्या बऱ्याच मनधरणीनंतर संपुष्टात आली. आता या चारही मतदारसंघातील सामना युती-आघाडी आणि मनसे यांच्यात होणार आहे.

शिवसेनेच्या अपक्ष उमेदवार बबन पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे माघार घेतल्याने पनवेल विधानसभेच्या निवडणुकीत युती अभेद्य असून त्याविरुद्ध शेकाप आघाडी असे चित्र असेल. तर उरण मतदारसंघात महेश बालदी यांनी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे युतीच्या दोन्ही पक्षांत लढत होणार आहे.

ऐरोली विधानसभे साठी एकूण १९ जणांनी अर्ज भरले होते पैकी तेरा अर्ज वैध ठरले तर ६ अर्ज बाद झाले व दोन जणांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे आता ऐरोलीच्या मैदानात ११ उमेदवारांच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी वैध १९ उमेदवारांमधून २ उमेदवारांनी माघार घेतली असून बेलापूर मतदारसंघाच्या निवडणूक

रिंगणात १७ उमेदवार असून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शहरप्रमुख  विजय माने यांनी माघार न घेतल्यामुळे बेलापूरमध्येही युतीत बंडखोरी कायम आहे.

त्यामुळे त्याचा फटका युतीच्या या मतदारसंघातील उमेदवार यांना बसणार का नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मनसेचे गजानन काळे आणि शिवसेनेतून बंडखोरी केलेल अपक्ष विजय माने यांच्यामध्येच मुख्य लढाई होणार असल्याचे चित्र आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनिल शालिक घोगरे आणि अभय दुबे यांनी माघार घेतल्यामुळे वैध १९ उमेदवारांपैकी आता फक्त १७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

मातोश्रीवरून आदेश आला..

उरण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर महेश बालदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बालदी माघार घेत नाहीत तोपर्यंत पनवेल विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे बबन पाटील हे निवडणूक लढणार होते. मात्र सोमवारी मातोश्रीवरून अचानक माघार घेण्याचा संदेश पाटील यांच्या भ्रमणध्वनीवर आल्यामुळे पाटील यांनी तातडीने माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कोणाला शिट्टी, तर कोणाला कपबशी

भाजपचे प्रशांत ठाकूर यांना कमळ, तर शेकापचे हरेश केणी यांना खटारा हे चिन्ह मिळाले. बहुजन मुक्ती पार्टीचे प्रवीण पाटील यांना खाट, बहुजन समाज पार्टी फूलचंद मंगल किटके यांना हत्ती, अपक्ष कांतिलाल कडू यांना शिट्टी, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे मानवेंद्र वैदू यांना जातं, इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीचे राजीवकुमार सिन्हा यांना लेखणीची ‘निप’, अपक्ष अरुण राम म्हात्रे यांना कपबशी, अपक्ष संजय चौधरी यांना चावी, हे चिन्ह देण्यात आले आहे.