राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या माघारीनंतर तर्कवितर्क

वारंवार प्रयत्न करून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत स्थान न मिळवू शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी राष्ट्रवादीने छुपी आघाडी केली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला साथ देण्यासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नसल्याची चर्चा असतानाच ठाणे शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुहास देसाई यांनी सोमवारी माघार घेतली. या मतदारसंघात मनसेने जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली असल्याने आता येथे भाजप विरुद्ध मनसे असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर, राष्ट्रवादीचे सुहास देसाई आणि मनसेचे अविनाश जाधव हे प्रमुख उमेदवार रिंगणार आहेत. मात्र, देसाई यांनी सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी माघार घेतली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहित पाहून हा निर्णय घेतला असून त्यामुळे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. देसाई यांनी माघार घेण्यामागे भाजप-शिवसेना युतीविरोधातील मतांची विभागणी होऊ न देणे, हा उद्देश असल्याची चर्चा आहे. आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाणे शहरची जागा काँग्रेसच्या वाटय़ाला यायची. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मिरा-भाईंदरची जागा काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीने ठाणे शहरची जागा पदरात पाडून घेतली. त्यानंतरही निवडणुकीतून राष्ट्रवादीने माघार घेतल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने कल्याण ग्रामीणची जागा आपल्या पदरात पाडून घेतली. परंतु, आयत्या वेळी येथे उमेदवारच दिला नाही. या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार सुभाष भोईर आणि ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेतील बंडाळी लक्षात

घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मनसेचे प्रमोद पाटील यांना साथ देण्यासाठी येथे उमेदवारच उभा केला नव्हता. मात्र, भोईर यांनी माघार घेतल्याने याठिकाणी आता मनसेचे प्रमोद पाटील आणि शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे.

दोन्ही पक्षांची वाढती जवळीक

राज ठाकरे यांच्या ईडी प्रकरणाच्या वेळेस अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात जाऊन जाधव यांची भेट घेतली होती. नौपाडय़ात आंबा स्टॉलवरून भाजप आणि मनसे यांच्यात झालेल्या वादानंतर जाधव यांनी आंदोलन केले होते. त्यावेळेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघातून माघार घेण्यामागे राष्ट्रवादीची मनसेला मदत करण्याची भूमिका असावी, अशी चर्चा आहे.