|| भगवान मंडलिक

कल्याण, डोंबिवलीतील राजकारणात विधानसभेचे पडसाद उमटणार

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मोठी ताकद असलेल्या शिवसेना-भाजपला जवळपास प्रत्येक मतदारसंघात विजयासाठी झुंजावे लागल्याचे चित्र पहायला मिळाले. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे राजू पाटील यांचा विजय आणि डोंबिवली मतदारसंघातून दिलेली कडवी झुंज याद्वारे मनसेचे महापालिका क्षेत्रातील बळ वाढले आहे. ही बाब शिवसेना-भाजपसाठी चिंतेची असली तरी, त्याहूनही अधिक चिंतन या दोन्ही पक्षांना आपापसातील दुहीबद्दल करावे लागणार आहे. दोन्ही पक्षांत झालेल्या बंडखोरीनंतरही युतीला दोन ठिकाणी यश मिळवता आले असले तरी, या कलहाचे पडसाद या भागातील आगामी राजकारणावरही दिसून येणार आहेत.

घरच्याला प्रवेश, बाहेरच्याला रस्ता

कल्याण शहर आणि ग्रामीण अशा भौगोलिक क्षेत्रात विस्तारलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात नेहमीच शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या पट्टय़ातून शिवसेनेविरोधात नाराजीचा सूरही उमटू लागला होता. विशेषत: २७ गावांच्या भागात शिवसेनेच्या भूमिकेबद्दल सातत्याने विरोध व्यक्त होत होता. या पाश्र्वभूमीवर मनसेचे राजू पाटील यांनी मिळवलेला विजय हा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसाठी आत्मचिंतनाचा विषय ठरणार आहे.

कल्याण ग्रामीणमधून    शिवसेनेचे सुभाष भोईर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. भोईर यांच्याविषयी ग्रामीण भागात नाराजी असुनही या भागातील सेनेचे वर्चस्व पाहून पक्षप्रमुखांनी भोईर यांना उमेदवारी दिली होती. असे असले तरी शिवसेनेचे या भागातील खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्तव येथून सुभाष भोईर यांची उमेदवारी कापण्यात आली आणि रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना रिंगणात उतरविण्यात आले. यामुळे शिवसेनेतील सुंदोपसुंदी पुढे आली. ही नाराजी, म्हात्रेंचा उग्र स्वभाव आम्हाला परवडणार नाही, असे २७ गावांसह परिसरातील रहिवाशांच्या तोंडून ऐकण्यास मिळत होते. डोंबिवलीतील ग्रामीण भागातून असलेले म्हात्रे यांच्यापेक्षा या पट्टय़ातील काटई गावचे रहिवासी असलेले राजू पाटील यांचा येथे जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे बाहेरच्या उमेदवाराला आमदारकीची संधी देण्यापेक्षा येथील मतदारांनी मनसेच्या उमेदवाराच्या पारडय़ात मते टाकली.

घामाघूम भाजप विजयी

डोंबिवलीतील प्रचार सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघाला साद घालून पारंपारिक विचाराधारा सोडून थोडा यावेळी वेगळा विचार करा, असे आवाहन केले होते. रस्ते, खड्डे, वाहन कोंडी, पूल बंद अशा अनेक विषयांवरून नाराज डोंबिवलीकर समाज माध्यमांतून प्रथमच आक्रमकपणे व्यक्त होत होता. यावेळी प्रथमच भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजप समोर मनसेने आव्हान उभे केले होते. मनसेची ही आक्रमता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अधिक वाढली. नाराज संघनिष्ठ मंडळी भाजप उमेदवाराच्या विरोधात कुजबूज माध्यमातून अधिक आक्रमक झाली. नागरी समस्या विषयावर अनेक मतदार नाराज होते, काही संघ निष्ठांची नाराजी, त्यात समाज माध्यमांतून व्यक्त होणारी नाराजी, काँग्रेस मंडळींचा छुपा हात अशी तिहेरी गुंतवणूक मतपेटीत एकदम झाली तर भाजप उमेदवाराला घाम फुटणार असे चित्र होते. परंतु, मागील ४० वर्षांपासून संघ परंपरंपरेशी एकनिष्ठ असलेला डोंबिवलीकर विकासक, वास्तुविशारद, वकील, डॉक्टर, कार्पोरेट मतदार पाच वर्ष नागरी प्रश्नावर किती भडभडून बोलत असला तरी निवडणुका आल्या की या समस्या खिशात घालतो हे पुन्हा एकदा डोंबिवलीकरांनी सिध्द करून दाखविले आहे. शहराच्या विचारधारेच्या बळामुळे आपण निवडून आलो आहोत. आपणास रोखण्यासाठी आघाडीचा हात हातात घेतला. विरोधकांच्या विखारी प्रचाराला मतदारांनी थारा दिला नाही. यापुढील काळात नागरी समस्या सोडविण्याला प्रथम प्राधान्य देणार आहे, असे भाजपचे विजयी उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

शिवसेनेच्या एकजुटीचा विजय

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात  यावेळी शिवसेनेच्या धुरंधरांनी कल्याणमधील मातब्बरांना मातोश्रीच्या अंगणात एकत्र आणले. त्यांच्यात सेनेतून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवर एकमत घडून आणले या एकजुटीतून कल्याण पश्चिमेचा गड राखण्यात यावेळी शिवसेनेला यश आले. कल्याण पश्चिमेतून भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांना उमेदवारी नाकारल्यानंतर सेनेत उमेदवारीवरून धुसफूस सुरू झाली होती. ही धुसफूस पुन्हा या भागात मनसे आणि बंडखोर भाजप

उमेदवाराला विजयी करण्यासाठी हातभार लावते की काय अशी परिस्थिती होती. पश्चिमेत सेनेची सुमारे सव्वा लाख मते आहेत. भाजपची सुमारे ४५ हजार मते आहेत. यावेळी गड गेला तर फक्त बुरूजाच्या मातीकडे येणाऱ्या काळात पाहावे लागेल असा विचार सेनेच्या मातब्बरांसह मतदारांनी केला आणि सेनेचे विश्वनाथ भोईर विजयी झाले.

पारंपरिक मतपेढी शाबूत

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे मागील १० वर्ष अपक्ष म्हणून नेतृत्व केलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या समोर यावेळी बंडखोर शिवसेना उमेदवार धनंजय बोडारे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारादरम्यान शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी बोडारे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली. मात्र, अखेरीस गायकवाड यांनी हा किल्ला सर करत आपली पारंपरिक मतपेढी शाबूत असल्याचे दाखवून दिले.

मागच्या १० वर्षांत गायकवाड यांनी गटार, पायवाटांशिवाय आमदार म्हणून करावयाची उद्यान, बगीचे, मनोरंजन, क्रीडानगरी सारखे उपक्रम राबविलेच नाहीत. पूर्व भागातील एकाही नगरसेवकाला कधी विकास कामांच्या विषयावर विश्वासात घेतले नाही. केवळ निवडणूक आली की मतदारांना सवलतीच्या दरातील किंवा मोफत केबल दाखविण्याचे आश्वासन देऊन आतापर्यंत गायकवाड यांनी निवडणुका जिंकल्या असे बंडखोर शिवसेना नगरसेवक, या भागातील काही जाणकार मंडळींचे म्हणणे होते. त्यामुळे गायकवाड यांची ही मक्तेदारी यावेळी मोडून काढण्यासाठी सेनेतील नाराज नगरसेवक, पदाधिकारी यांनी उघडपणे बंडखोर बोडारे यांचे काम करून गायकवाड यांच्या समोर आव्हान उभे केले होते. शहरी, ग्रामीण अशा पट्टयात विभागलेल्या या मतदारसंघात विकास कामे दिसतच नसल्याने यावेळी फुकट केबलला सोकावलेला मतदार पूर्व भागातील नागरी समस्यांचा विचार करून यावेळी परिवर्तनाच्या वाटेवर प्रवास करील असे चित्र होते. परंतु, चाळी, झोपडपट्टय़ा आणि ग्रामीण भागातील पारंपारिक मतदाराला गायकवाड आपलेसे वाटल्याचे चित्र पहायला मिळाले. याठिकाणी शिवसेनेचे बोडारे यांनी चांगली मते घेतली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचाही त्यांना पाठींबा होता. त्यामुळे आगामी काळात या भागात शिवसेना विरोधात भाजप असा संघर्ष पहायला मिळू शकतो.