राष्ट्रवादीचा अर्ज बाद झाल्यानंतर ओमी कलानीकडून अपक्ष अर्जही मागे

भाजपने तिकीट नाकारल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात कायम राहाण्यासाठी ओमी कलानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत अर्ज बाद ठरल्यानंतर अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्जही त्यांनी सोमवारी मागे घेतला आहे. त्यामुळे उल्हासनगर विधासभा मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ज्योती कलानीच भाजपच्या कुमार आयलानी यांच्यापुढे उभ्या ठाकल्या आहेत.

चार वेळा उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या पप्पू कलानी यांचा पुत्र ओमी कलानी यांना महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून तीन अपत्य असल्याने बाहेर पडावे लागले होते. असे असले तरी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मदतीने महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढवून भाजपचे विधानसभेचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न ओमी कलानी यांनी केला. त्यामुळे भाजपातील निष्ठावंत नाराज झाले होते. दरम्यान, तिकीट वाटप करताना भाजपने कलानी कुटुंबीयांना मागे सारत माजी आमदार कुमार आयलानी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे विधानसभेत अस्तित्व राखण्यासाठी कलानी कुटुंबीयांनी धावपळ करत राष्ट्रवादीकडे मदतीची याचना केली होती. अखेर ज्योती कलानींसह ओमी कलानी यांनाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एबी फॉर्म मिळाला होता. छाननी दरम्यान ओमी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भरलेला अर्ज बाद ठरल्याने अपक्षाच्या अर्जावर ओमी कलानी निवडणूक रिंगणात होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळी ओमी कलानी याने आपला अपक्ष अर्जही मागे घेतला. राजकीय आयुष्यातील पहिली निवडणूक लढवणाऱ्या ओमी कलानी यांना अधिकृत चिन्हाची ताकद हवी होती. अपक्ष रिंगणात उतरल्यास दगाफटका झाल्यास राजकीय कारकीर्दीला सुरुवातीलाच धक्का बसेल अशी भीती होती. त्यामुळे त्यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. भाजपातील आपले स्थान कायम राहावे, पंचम कलानी यांचे महापौरपदही कायम रहावे यासाठी ओमी कलानी यांनी ही राजकीय खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपतर्फे उमेदवारी मिळाली असती तर ओमी कलानी स्वत:च रिंगणात राहिले असते, अशीही शक्यता व्यक्त होते आहे. मात्र आता ज्योती कलानी स्वत: रिंगणात राहिल्याने ओमी कलानी यांची राजकीय अडचणही दूर होणार असल्याचे बोलले जाते. ओमी कलानींच्या भाजपविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ओढावला जाणारा रोषही संपण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीची पुनरावृत्ती

उल्हासनगर मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या लढतीची पुनरावृत्ती होणार हे स्पष्ट झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत विद्यमान भाजप आमदार कुमार आयलानी यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ज्योती कलानी यांचे आव्हान होते. तर भाजपच्या लाटेतही ज्योती कलानी यांनी उल्हासनगरमध्ये विजय मिळवला होता. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.