28 May 2020

News Flash

बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न

१९९५ ते २००९ या चार निवडणुका जिंकून अनिल देशमुख यांनी काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले होते.

(संग्रहित छायाचित्र)

 

|| अविष्कार देशमुख

काटोल विधानसभा मतदारसंघ  : – काटोल विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख  यांना २०१४ च्या निवडणुकीत बालेकिल्ल्यातच अनपेक्षितपणे भाजपकडून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता त्यांनी निवडणुकीत त्यांचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. त्यांच्या विरुद्ध भाजपचे चरणसिंह ठाकूर यांच्यासह १० उमेदवार रिंगणात आहेत.

१९९५ ते २००९ या चार निवडणुका जिंकून अनिल देशमुख यांनी काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले होते. या काळात राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता. मंत्री म्हणून त्यांनी या भागाचा विकास आणि लोकांशी संपर्क कायम ठेवला होता. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत त्यांना भाजपचे उमेदवार आशीष देशमुख यांच्याकडून निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र आशीष यांनी नंतर तीन वर्षांतच भाजपचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांची अनिल देशमुख यांना मदत होणार आहे.

दरम्यान, पराभूत होऊनही देशमुख यांनी मतदारसंघाशी संपर्क ठेवला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने केली. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचे जाळे हे त्यांचे बलस्थान आहे. शेतकरी कामगार पक्षाला मानणारा एक गट मतदारसंघात आहे. आघाडीत हा पक्ष असल्याने त्याचे  नेते राहुल देशमुख  राष्ट्रवादीसोबत आहे. मात्र भाजपने ग्रामीण भागात मारलेली मुसंडी देशमुखांसाठी अडचणीची ठरू शकते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच येथे घेतलेल्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

दुसरीकडे भाजपने नितीन गडकरी समर्थक चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. ठाकूर विरुद्ध देशमख अशी लढत यापूर्वी २००९ मध्ये झाली होती. तेव्हा ठाकूर हे तिसऱ्या आघाडीचे (रिडालोस) उमेदवार होते. त्यांचा ३५ हजारांनी पराभव झाला होता. मात्र यावेळी त्यांच्यासोबत भाजपची संपूर्ण यंत्रणा आहे. आशीष देशमुख यांनी राजीनामा दिल्यावर भाजपने संघटनेच्या माध्यमातून हा मतदारसंघ सांभाळला. अनेक विकासकामे आणि त्यासाठी घसघशीत निधी आणला. त्याचा फायदा ठाकूर यांना होऊ शकतो. ठाकूर यांचा प्रभाव काटोल शहरात असून पालिका त्यांच्या हाती आहे. मतदारसंघातील पारडशिंगा देवस्थानाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातही संपर्क ठेवला आहे. गडकरींसह इतरही भाजप नेत्यांनी येथे सभा घेऊन ठाकूर यांच्या प्रचाराला गती दिली आहे. मात्र काटोल शहर वगळता इतर भागात त्यांचा प्रभाव मर्यादित दिसतो.  राज्य सरकारविरोधात असलेल्या शेतकऱ्यांमधील नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो. दुसरीकडे सेना पूर्ण क्षमतेने भाजपसोबत नाही. काही भागात शिवसेना प्रभावी आहे.

मतदारसंघात भाकरी फिरवण्याचा अनुभव लोकांनी घेतला आहे. आशीष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे त्याचे चटकेही त्यांना बसले आहे. त्यामुळे जुने तेच सोने असे म्हणून अनिल देशमुखांच्या बाजूने सहानुभूतीचा कौल मिळू शकतो. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह नागपुरातील काही भाजप नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2019 3:50 am

Web Title: vidhan sabha election ncp bjp akp 94 2
Next Stories
1 देहव्यापारासाठी पत्नी, मुलगी व मुलाला पळवले
2 माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांना धक्का
3 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो, ‘नोटा’ नकोच!
Just Now!
X