News Flash

मंत्री पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागरांचा दारुण पराभव

माजलगावमध्ये माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी रमेश आडसकरांचा पराभव करून मतदारसंघ पुन्हा खेचून घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसला चार, तर भाजपला दोन जागा

परळी मतदारसंघातून भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा तब्बल ३० हजारांच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पराभव करून या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले. मुंडे बहीण-भावाच्या लढतीत पहिल्या फेरीपासूनच धनंजय यांची आघाडी कायम राहिली. बीड मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यातील अटीतटीची लढत शेवटपर्यंत दोघांचेही श्वास रोखणारी ठरली. शेवटच्या फेरीत संदीप क्षीरसागर यांनी एक हजार ७८६ मतांनी विजय मिळवून काकाची सद्दी संपवली. भाजपच्या हक्काच्या आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी भीमराव धोंडे यांचा धक्कादायक पराभव करून सर्वाचेच अंदाज चुकवले.  माजलगावमध्ये माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी रमेश आडसकरांचा पराभव करून मतदारसंघ पुन्हा खेचून घेतला. केज आणि गेवराई हे दोन मतदारसंघ भाजपने राखले. विद्यमान मंत्री पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांचा दारुण पराभव झाल्याने मुंडे-क्षीरसागरांच्या सहमतीच्या राजकारणालाही धक्का बसला आहे.

बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या सहाही मतदारसंघातील निकाल सर्वच दूरचित्रवाहिन्यांसह जाणकारांचे अंदाज चुकवणारे ठरल्याने मतदारांना गृहीत धरुन नेतृत्व करणाऱ्यांनाही धक्का बसला आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेकांनी सभा घेतल्या. मात्र, राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकहाती प्रचार करत मतदारसंघात तब्बल ३० हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला. मुंडे बहीण-भावातील लढत प्रचारात अटीतटीची दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्या फेरीपासूनच धनंजय यांनी आघाडी घेत शेवटपर्यंत भाजपला धोबीपछाड देत विजय मिळवला. मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे साखर कारखान्यासह बहुतांश संस्था असताना पराभवाचा सामना करावा लागला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा ३० वषार्ंपासून गड असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने पंकजा मुंडे यांच्या राजकीय नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धनंजय यांनी स्वतसह जिल्ह्यत राष्ट्रवादीच्या चार जागा जिंकून आपले राजकीय कसब दाखवून दिले.

बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाऊन मंत्रिपद मिळवलेले जयदत्त क्षीरसागर आणि पुतणे राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची लढत झाली. दोघांच्याही कार्यकर्त्यांची श्वास रोखणाऱ्या या लढतीत शेवटच्या फेरीत पुतण्याने काकावर मात करत एक हजार ७८६ मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघावरही जयदत्त क्षीरसागर यांची पुतणे संदीप यांनी सद्दी संपवली असून पुतण्याच्या विजयाने काकाच्या राजकीय भवितव्यावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल ७० हजारांचे मताधिक्य देणाऱ्या आष्टी मतदारसंघातही राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांचा २५हजार ३८५ मतांनी दारुण पराभव केला. माजलगाव मतदारसंघातही राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाजपचे रमेश आडसकर यांचा १२ हजार ९९३ मतांनी पराभव करून मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व निर्माण केले. गेवराई मतदारसंघात भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी अटीतटीच्या लढतीत सहा हजार ९०० मतांनी आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले. तर केज मतदारसंघात ऐनवेळी भाजपात गेलेल्या नमिता मुंदडा यांनी पृथ्वीराज साठे यांचा ३३ हजारांच्या मताधिक्याने पराभव करून हा मतदारसंघ पाच वषार्ंच्या खंडानंतर पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आहे. मागच्यावेळी सहापकी भाजपकडे पाच तर राष्ट्रवादीकडे एक मतदारसंघ होता. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने चार मतदारसंघ मिळवत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. परळी आणि आष्टी मतदारसंघातील पराभव भाजपसाठी धक्कादायक असून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या आष्टी, माजलगाव मतदारसंघातील पराभवाने नेतृत्वाची पकड सल झाल्याचे चित्र समोर आले आहे. दोन विद्यमान मंत्री पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या सहमतीच्या राजकारणालाही मतदारांनी पराभवाचा धक्का दिला आहे.

परळी मतदारसंघातील जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत असून यापुढे आपण जनता आणि कार्यकर्त्यांसाठी कार्यरत राहणार आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची मुलगी असल्याने पराभवाने खचून जाणार नाही. विजयाची खात्री होती. त्यामुळे ज्यांचा विजय झाला त्यांनाही तो अनाकलनीय आहे. – पंकजा मुंडे , भाजपा उमेदवार

परळी मतदारसंघातील जनतेने सर्व स्तरांतून पाठिंबा दिला. विजय झाल्याचा आनंद असला तरी कुटुंबातील व्यक्तीचाच पराभव झाल्याने मनात खंतही आहे. निवडणुकीच्या शेवटी अत्यंत चुकीच्या पद्धतीने बहीण-भावाच्या नात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न हा वेदनादायी होता. जनतेनेच मतदानातून या प्रकाराला उत्तर दिले आहे. पाच वर्षांतच विकासाची सर्व आश्वासने पूर्ण करणार. – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी उमेदवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 5:44 am

Web Title: vidhan sabha election ncp conress result pankaja munde akp 94
Next Stories
1 लातूर ग्रामीणमध्ये ‘नोटा’चा विक्रम २६ हजार ८९९ ‘नोटा’चे मतदान
2 वर्धा जिल्हय़ात भाजपला शंभर टक्के यश
3 सांगोल्यात शेकापचा गड ढासळला, माळशिरसमध्ये कमळ फुलले
Just Now!
X