ऐरोली, बेलापूरमध्ये राष्ट्रवादी आणि मनसेच्या मतांची चर्चा

नऊ लाख मतदार संख्या असलेल्या नवी मुंबईतील दोन मतदार संघात राष्ट्रवादी आणि मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा मुद्दा शहरात यानंतर विरोधी पक्ष असल्याची जाणीव करून देणारा ठरला आहे.

ऐरोलीत राष्ट्रवादीचे गणेश शिंदे यांना ३५ हजार मते मिळालेली आहेत. एक साधे माथाडी कामगार असलेले शिंदे यांनी केवळ राष्ट्रवादीच्या नावावर इतक्या मतांची मजल मारलेली आहे. त्यांच्यासोबत दुसरे प्रतिस्पर्धी मनसेचे नीलेश बाणखेले यांनीही २२ हजार मते घेऊन अस्तित्व सिद्ध केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील दोन उमेदवारांसाठी नेरुळ येथे एक जाहीर सभा घेतली होती. त्याचा फायदा बेलापूरचे उमेदवार गजानन काळे व ऐरोलीतील बाणखेले या दोघांना काही प्रमाणात झाल्याचे दिसून येते. शिंदे आणि बाणखेले आणि  इतर पक्षाच्या उमेदवारांची मते एकत्रित केल्यास ऐरोलीत ६० हजार मतदारांचा भाजपचे उमेदवार नाईक यांना विरोध दर्शविला आहे.

याशिवाय या मतदार संघात पाच हजार मते ‘नोटा’ला मिळाली आहेत. त्यामुळे सहा महिन्यांनी होणाऱ्या पालिका निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपला डोईजोड होणार असे दिसून येते.

त्यावेळी शिवसेना ही विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका राबविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेलापूर मतदारसंघातही राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांनी ४४ हजार मतांचा पल्ला गाठला आहे. केवळ एका प्रभागापुरते नगरसेवक राहिलेले गावडे यांनी शेवटच्या क्षणी तयारी सुरू  केली. नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर एकही नगरसेवक राष्ट्रवादीत राहिला नाही. अशा वेळी गावडे आणि त्यांच्या नगरसेवक कन्येने राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. त्यामुळे गावडे यांना पक्षाचे अध्यक्ष आणि लागलीच उमेदवार मिळाली. त्यांच्यासाठी पक्षाचा कोणताही नेता प्रचारासाठी मैदानात उतरला नाही. काँग्रेसची साथही त्यांना फारशी लाभली नाही. गावडे यांनी एकटय़ाने हा किल्ला लढवला आणि ४४ हजार मते पदरात पाडून घेतली. त्यांच्या सोबत मनसेचे गजानन काळे हे दुसऱ्यांदा मैदानात उतरले होते. त्यांनी गेल्या निवडणूकीपेक्षा सहा पट मते मिळविली आहेत. २७ हजार मतांच्या शिदोरीवर काळे यानंतर बेलापूरात एक सक्षम विरोधी पक्ष ठरु शकणार आहेत. या दोन्ही विरोधकांची मते ७० हजाराच्या घरात जात आहेत. त्यामुळे म्हात्रे यांना मिळालेल्या ८७ हजार मतांच्या जवळपास हा आकडा पोहोचत आहे. दोन्ही मतदार संघातील राष्ट्रवादीचे एकूण मतदान ८० हजारांपर्यंत आहे तर मनसेचे एकूण मतदान ५० हजारांच्या घरात असून दीड ते पावणेदोन लाख मतदारांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना नकार दिला आहे. त्यामुळे एकतर्फी  सत्ताबदलास विरोधकांनी स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.