|| बाळासाहेब जवळकर

लक्ष्मण जगताप, राहुल कलाटे यांच्यातच पुन्हा लढत

चिंचवड विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी लढलेले लक्ष्मण जगताप विरूद्ध राहुल कलाटे हीच लढत यंदा पुन्हा होत आहे. फरक इतकाच,की गेल्या वेळी भाजप-शिवसेनेची युती नव्हती, यंदा आहे. युती असतानाही भाजप आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेवकाने बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीने स्वत:चा उमेदवार रिंगणात न आणता सेना बंडखोराला पुरस्कृत केले आहे.

भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा चिंचवड मतदारसंघ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदारसंघ आहे. जवळपास सव्वा पाच लाख मतदारसंख्या आहे.  २००४ पासून लक्ष्मण जगताप आमदार आहेत. सर्वप्रथम ते पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचे (विधान परिषद) प्रतिनिधित्व करत होते. २००९ ला अपक्ष आणि २०१४ मध्ये ते भाजपच्या तिकिटावर चिंचवडमधून निवडून आले. यंदा ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या श्रीरंग बारणे यांना चिंचवडमधून ९६ हजाराचे मताधिक्य मिळाले, त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गेल्या १० वर्षांत चिंचवडचे राजकारण बारणे, जगताप आणि कलाटे यांच्याभोवतीच फिरते आहे. २००९ मध्ये बारणे-जगताप यांच्यातील लढतीत जगताप विजयी झाले, तेव्हा कलाटे हे जगतापांचे शिलेदार होते. २०१४ मध्ये मावळ लोकसभेच्या आखाडय़ात जगतापांना बारणे यांनी पराभूत केले, तेव्हा कलाटे हे बारणे यांच्या तंबूत होते. नंतरच्या घडामोडीत जगताप भाजपमध्ये गेले. भाजपने जगतापांना चिंचवडमधून उमेदवारी दिली, तेव्हा कलाटे शिवसेनेकडून रिंगणात होते. या लढतीत जगतापांना १ लाख २३ हजार, तर कलाटे यांना ६३ हजार  मते मिळाली. राष्ट्रवादीचे नाना काटे तिसऱ्या क्रमांकावर होते. काटे यांच्या राष्ट्रवादीने यंदा कलाटे यांना पुरस्कृत केले आहे. लोकसभेवेळी मनोमिलन झाल्याने बारणे हे जगतापांच्या प्रचारात आघाडीवर असून त्यांच्या अधिक मताधिक्यासह विजयासाठी प्रयत्नशील आहेत. वाकडमधून तीन नगरसेवकांसह निवडून आलेल्या कलाटे यांना मनसे आणि वंचित आघाडीने पठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने विश्वासात घेतले नाही म्हणून काँग्रेसने थयथयाट केला, मात्र दोन्हीकडील नेत्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. जगतापांना महायुतीचे पाठबळ आहे. मतदारसंघात त्यांची वैयक्तिक ताकद मोठी आहे. १५ वर्षे आमदार असल्याने मतदारसंघात ते सर्वपरिचित आहेत. मात्र, प्रस्थापितांच्या विरोधात असलेली नाराजी त्यांच्या विरोधातही दिसते. पिंपरी पालिकेच्या गैरकारभाराचे खापर त्यांच्यावरही फुटते. मुख्यमंत्र्यांच्या सभेने जगतापांची चांगली वातावरणनिर्मिती झाली. उद्धव ठाकरे यांनी पिंपरीच्या सभेत कलाटे यांचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तोच मुद्दा खासदार बारणे खुबीने वापरत आहेत. दोघेही उमेदवार स्थानिक आहेत. एकमेकांचे डावपेच चांगल्याप्रकारे ओळखून आहेत. मतदारसंघात बाहेरचा वर्ग मोठा असून सुशिक्षित मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. रंगतदार झालेल्या या लढतीत मतदार राजा कोणाला कौल देतो, याविषयी उत्सुकता आहे.