27 May 2020

News Flash

मतदारांचा निरुत्साह, टक्केवारी घसरली

मतदानात वाढ व्हावी म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक शाखेने प्रयत्न केले होते.

शहर ५१ टक्के-ग्रामीण ६५.५५- एकूण ५८.३ टक्के; सर्वाधिक मतदान पूर्वमध्ये तर सर्वात कमी पश्चिममध्ये विद्यमान सरकारने पाच वर्षांत केलेली विकास कामे, त्याचा सत्ताधारी पक्षाने केलेला प्रचार आणि प्रसार, मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून आयोगाने केले विशेष प्रयत्नानंतरही मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह नसल्याचे मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीवरून स्पष्ट होते. जिल्ह्य़ातील एकूण १२ मतदारसंघामध्ये  ५८.३ टक्के म्हणजे निम्म्याच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ही टक्केवारी ६० टक्के होती. शहरातील सहा मतदारसंघात एकूण ५१ टक्के तर ग्रामीण मध्ये ६५.५५ टक्के मतदानाची नोंद झाली.  शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये अधिक मतदान झाल्याचे दिसून येते. शहरी भागातील लोकांची नाराजी हे मतदान कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते.

सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यावर पहिल्या दोन तासात सकाळी ९  पर्यंत एकूण ७ टक्के मतदान झाले होते. त्यात सर्वाधिक पूर्वमध्ये ८.८५ टक्के तर सर्वात कमी ७.३६ उत्तर मध्ये झाले. दुपारी ११ पर्यंत १९.४७ टक्के नोंद झाली. दुपारी ३ पर्यंत ४०.०७ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी मतदान    संपल्यावर शहरातील सहाही मतदारसंघात मिळून एकूण ५८.३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक मतदान पूर्व नागपूरमध्ये (५३.५३टक्के) तर सर्वात कमी मतदानाची नोंद पश्चिम (४९.६०टक्के) मध्ये करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द.पश्चिम मतदारसंघात ५०.३७ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये येथे ५६ टक्के मतदान झाले होते हे येथे उल्लेखनीय.

मतदानात वाढ व्हावी म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक शाखेने प्रयत्न केले होते. अपंग व महिलांसाठी विशेष व्यवस्था केली होती. सखी आणि आदर्श केंद्र तयार केले होते. पावसानेही आज साथ दिली होती. विशेष म्हणजे विद्यमान सरकारने केलेल्या विकास कामांच्या आधारावर सत्ताधारी भाजपने प्रचार केला होता.  राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेही शतप्रतिशत मतदान करावे,असे आवाहन केले होते. मात्र त्याचे प्रतिबिंब मतदान केंद्रावर दिसून आले नाही. मोजक्याच केंद्रावर मतदानासाठी रांगा दिसल्या. केंद्रावर मतदारांची गर्दी नव्हती. गर्दी होती ती राजकीय पक्षांच्या बुथवर. मतदार मतदान करून कुठलीही प्रतिक्रिया न देता जाताना दिसला. दक्षिण-पश्चिम हा सुशिक्षित मध्यमवर्गीयांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. येथे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिंगणात होते. युवकांचा मोठा वर्ग त्यांच्यासोबत प्रचारात होता. मात्र या मतदारसंघातील प्रतापनगर, साईबाबा मंदिर परिसर, धरमपेठ, सहकार नगर भागात सकाळी केंद्रावर गर्दी नव्हती. मुंडले स्कूलमध्ये रांगा दिसून आल्या.उत्तर नागपूरमध्ये नागसेन केंद्रासह इतरही काही केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. मध्य नागपूरमध्ये मोमीनपुरा, हंसापुरी, महात्माफुले हायस्कूल या केंद्रावर सकाळी गर्दी नव्हती. सर्वच मतदारसंघात सार्वत्रिक चित्र होते. लोकसभेच्या तुलनेतही विधानसभेत मतदान कमी झाल्याने त्याच्या फायद्या तोटय़ाची चर्चा राजकीय  वर्तुळात सुरू झाली आहे.

निरुत्साहाला एक कारण असेही..

लोकसभेप्रमाणे विधानसभेत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. काही  मोजके मतदान केंद्र वगळता बहुतांश केंद्रावर शुकशुकाट होता. यासंदर्भात लोकसत्ताने शहरातील विविध भागातील लोकांशी चर्चा केली.  लोकसभेत आम्ही ज्यांना मतदान केले  त्यानुसार निकाल आले नाहीत. त्यामुळे ईव्हीएमवर संशय निर्माण झाला. आम्ही कोणालाही मतदान केले तरी  एक विशिष्ट पक्षच विजयी होत असेल तर आम्ही मतदान का करावे, असा सवाल मध्य नागपुरातील एक मतदार उज्ज्वल समर्थ यांनी केला. तसेच अनेकांनी मतदान न करण्याचे कारण ईव्हीएममधील घोळ असल्याचे सांगितले.

मतदारसंघ निहाय टक्केवारी

मतदारसंघ  २०१९     २०१४ २००९

द-पश्चिम   ५०.३७      ५६.२३        ४७.५८

दक्षिण      ५०.८०     ५३.२७        ४९.८

पूर्व         ५३.५३         ५६.२८       ५६.८५

मध्य        ५०.८८     ५५.१२         ५०.७६

पश्चिम      ४९.६०      ५२.१४         ४६.९६

उत्तर        ५१.११      ५३.५५         ४८.०२

२४ ला मतमोजणी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील जिल्ह्य़ातील १२ विधानसभा मतदारसंघातील १४६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहेत.  २४ तारखेला    मतमोजणी होणार आहे.

मतदानाचा उत्साह फक्त समाजमाध्यमांवरच

कालपासून मतदारांना मतदान करण्यासाठी समाजमाध्यमांवरून विविध राजकीय पक्षाकडून आवाहन केले जात होते. राजकीय पक्षआचे नेते, प्रमुख कार्यकर्ते आणि समाजातील प्रतिष्ठितांनीही मतदान केल्यानंतरचे छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकून मतदारांना मतदान करा, असे सूचित केले होते. मात्र त्यानंतरही मतदान केंद्रावर रांगा दिसून येत नव्हत्या. समाजमाध्यमांवरील मतदानाचा उत्साह प्रत्यक्षात दिसलाच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:17 am

Web Title: vidhan sabha election percent voting akp 94
Next Stories
1 ईव्हीएम बिघाडाने  मतदार त्रस्त
2 विक्की कुकरेजांच्या कार्यालयावर छापा
3 Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भात उमेदवारावर हल्ला
Just Now!
X