|| नीलेश अडसूळ

‘निवडणूक चिन्ह’ मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड:- पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या राजकीय पक्षांच्या बंडखोरांकडे पक्षात असताना केलेल्या कामांचा ‘ऐवज’ असला तरी, पक्षाचे अधिकृत चिन्ह मात्र नाही. नव्या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या अपक्षांसमोर सर्वात पहिले आव्हान आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे असणार आहे. आयोगाकडून मिळालेली बॅट, शिट्टी आणि रिक्षा अशी चिन्हे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हे उमेदवार नवनवीन कल्पना राबवत आहेत.

सेना-भाजपमधील बंडखोर उमेदवारांमुळे वांद्रे, वर्सोवा, अंधेरी, घाटकोपर या विभागांतील लढती चुरशीच्या झाल्या आहेत. इथल्या अपक्ष उमेदवारांच्या हाती बाण आणि कमळाऐवजी बॅट, शिट्टी आणि रिक्षा यांसारखी चिन्हे आली आहेत. वांद्रे पूर्वमधील तृप्ती सावंत यांना बॅट, घाटकोपर पश्चिममधील संजय भालेराव यांना शिट्टी तर वर्सोव्यात राजुल पटेल आणि अंधेरी पूर्वमधील मुरजी पटेल यांना रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे. शिवसेनेला आव्हान देत उभ्या राहिलेल्या राजुल पटेल यांनी रिक्षा या चिन्हाला प्रमाण मानून जोरदार प्रचार सुरू के ला आहे. त्यासाठी सर्व प्रचार त्या रिक्षात फिरून करणार आहेत. विभागातील स्थानिक लोकांपर्यंत ‘रिक्षा’ पोहोचवण्यासाठी रिक्षाचे चित्र असलेले बॅच, स्टिकर, फलक त्यांनी तयार के ले आहेत. ‘माझा आजवरचा सर्व प्रवास रिक्षातूनच करत आले आहे. मी के लेल्या कामांची सामान्य माणसांना पूर्ण जाणीव आहे. फक्त आता रिक्षा हे चिन्ह पोहोचवणे गरजेचे असल्याने सर्व प्रचार मी रिक्षातूनच करणार आहे,’ असे राजुल पटेल यांनी सांगितले. तर ‘आजवरच्या मी के लेल्या कामामुळे विभागात माझा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही,’ असा टोला लगावत मुरजी पटेल यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनाही रिक्षा चिन्ह मिळाले असले तरी रिक्षात बसून प्रचाराची कल्पना त्यांना मान्य नाही. पत्रक आणि समाजमाध्यमांतून आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वांद्रे पूर्वमधील शिवसेनेचे प्रकाश (बाळा) सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना ‘बॅट’ हे चिन्ह मिळाले आहे. प्रचारादरम्यान तृप्ती सावंत यांना विभागातील अनेक मंडळांकडून, संस्थांकडून बॅट भेट म्हणून दिली जात आहे. याशिवाय तृप्ती सावंत यांच्यासह कार्यकर्तेही हातात बॅट घेऊ न प्रचारात उतरत आहेत. ‘आजवर माझे नाव आणि काम सेनेच्या माध्यमातून पोहोचले आहे; परंतु कामामुळे मतदार आजही माझ्या पाठीशी आहेत आणि राहतील. माझे नवे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत,’ असेही त्या म्हणाल्या. घाटकोपर पश्चिममधील संजय भालेराव यांना शिट्टी हे चिन्ह आल्याने भालेराव यांच्या प्रचारात प्रचारकर्त्यांच्या हातात शिट्टी आली आहे.