|| नीरज राऊत

वरिष्ठांच्या सूचना न आल्याने पालघर, बोईसरमधील कार्यकर्ते संभ्रमात:- विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप या पक्षांमध्ये युती झाली असली तरी काही ठिकाणी या दोन्ही पक्षांतील विस्तव जात नसल्याचे चित्र आहे. पालघर व बोईसर या विधानसभेच्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार असून या दोन्ही मतदारसंघांतील भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी युतीच्या प्रचारात कधी व कसे उतरायचे या संभ्रमात आहेत. याबाबत आपल्या वरिष्ठांकडून सुस्पष्ट आदेश यावेत याची ही मंडळी वाट पाहत आहेत.

पालघर जिल्ह्य़ाच्या निर्मितीपासून जिल्हा परिषदेतील सभापती पदाच्या निवडणुकीवरून निर्माण झालेला वाद पुढे अनेक वष्रे चिघळला होता. त्यात खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिल्याने हा वाद विकोपाला गेला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडे असलेली पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेने हट्ट करून श्रीनिवास वनगा यांच्यासाठी मागून घेतली. मात्र त्यानंतर भाजपचे लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत पक्षांतर करायला लावून त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपमध्ये वादाचे प्रकार अनेकदा घडले असून ‘पालघर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला’ अशा आरोळ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ऐकायला मिळत असे.

पालघर विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसला तरी बोईसरमध्ये भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व संघाचे प्रदीर्घ काळ प्रचारक म्हणून काम पाहिलेले संतोष जनाठे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. जनाठे यांनी उमेदवारी दाखल करताना भाजपचे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी जातीने हजर असल्याचे दिसून आले आहे. पालघर-बोईसर विधानसभा क्षेत्रात भाजपकडे चार जिल्हा परिषद सदस्य असून पक्षसंघटना गेल्या पाच वर्षांत अधिक मजबूत

झाली आहे. त्यामुळे आपले उमेदवार रिंगणात नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दोन हात करणाऱ्या शिवसेनेकरिता कितपत मदत करायची हा भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.

जनाठे यांना पाठिंबा

एकीकडे बंडखोरी केलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई झाली नसताना दुसरीकडे भाजप स्थानिक पुढारी जनाठे यांच्या मदतीला लागले आहेत. भाजपच्या समाजमाध्यमांवर प्रचारदौऱ्याचे वेळापत्रक झळकू लागले आहेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप महिला संघटनांनी बंडखोर उमेदवारांच्या प्रचाराला अधिकृत सहभागी झाल्या असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३५० कार्यकर्ते संतोष जनाठे यांच्या प्रचाराला बोईसर मतदारसंघात लागले आहेत. एकीकडे पक्ष संघटनेकडून कोणतेही अधिकृत आदेश देत असताना स्थानिक पदाधिकारी युतीचे उमेदवाराच्या विरोधातील बंडखोर उमेदवाराला पाठीशी घालत असल्याने स्थानिक भाजप कार्यकर्ता गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पालकमंत्री गैरहजर

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक सोमवारी पालघर व बोईसर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नियोजित वेळी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अशा परिस्थितीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्ह्य़ात असताना आयत्या वेळी या दोन्ही बैठकीला गैरहजर राहिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.