|| किशोर कोकणे

रस्त्यांवरील तपासणी टाळण्यासाठी शक्कल; ठाणे, मुंबईतील स्थानकांतून कोटय़वधीची रोकड जप्त :- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना वाटण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी होणाऱ्या काळ्या पैशाच्या वाहतुकीवर निवडणूक आयोग आणि पोलीस काटेकोरपणे लक्ष देत असल्याने या पैशांच्या वाहतुकीसाठी संबंधितांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. रस्त्यावरील वाहनांची तपासणी टाळण्यासाठी रेल्वेगाडय़ांतून पैशांची वाहतूक केली जात असल्याचे मुंबई आणि ठाण्यातील काही रेल्वे स्थानकांवरून जप्त करण्यात आलेल्या कोटय़वधी रुपयांच्या रकमेवरून उघड होत आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोग, स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून ठिकठिकाणी तपासणी सुरू असते. या कालावधीत सर्वाधिक रस्ते आणि महामार्गावर धावणाऱ्या खासगी कार आणि दुचाकींची तपासणी केली जात असते. ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील प्रमुख रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी तपासणी नाके उभारले असून मतदानाच्या दिवसाअखेपर्यंत ही तपासणी केली जाते. या काळात ५० हजारांपेक्षा अधिक रोकड बाळगणाऱ्यांना तपासणीदरम्यान व्यवहाराच्या नोंदी सादर कराव्या लागतात. मतदानाची तारीख जवळ आल्याने पोलिसांनी जागोजागी तपासणी नाके वाढविल्याने सावध झालेल्या काही राजकीय मंडळींनी रोकड रकमेची नेआण करण्यासाठी रस्ते ऐवजी रेल्वे मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकात लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. निवडणुकांच्या कालावधीत रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस या स्थानकात तपासणी करत असले तरी अपुरे मनुष्यबळ आणि प्रवाशांच्या संख्येमुळे प्रत्येक प्रवासी तपासने शक्य होत नसते. याच प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत गैरव्यवहार करणाऱ्यांनी पैशांची देवाण-घेवाण रेल्वे मार्गावरून सुरू केली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात २ ऑक्टोबरला दोन तरुणांकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी १५ हजार अमेरिकन डॉलर आणि ४ लाख ५० हजार रूपयांची रोकड जप्त केली. ही रोकड हे दोघे मुंबईत एका व्यक्तीला देण्यासाठी जाणार होते. मात्र, स्थानकातील तपासणीदरम्यान सुरक्षा दलाने ही रोकड जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. तसेच आरोपी आणि जप्त डॉलर सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.  ३ ऑक्टोबर रोजी गुजरात एक्स्प्रेसमधून मुंबईहून गुजरातच्या दिशेने मोठय़ा प्रमाणात रोकड नेण्याचा प्रयत्न झाला होता. बोरिवली रेल्वे पोलिसांनी सापळा रचत हा प्रकार हाणून पाडला. या कारवाईत पोलिसांनी रेल्वेतील डब्यांची तपासणी केली असता, ३५ बॅगा भरून कोटय़वधींचा मुद्देमाल जप्त केला. यात १० लाख रुपयांच्या रोकडसह मद्य, साडय़ा आणि भेटवस्तूंचा समावेश होता.

काटेकोर तपासणी

सकाळी आणि रात्रीच्या तपासणीसाठी रेल्वे स्थानकांत जवान तैनात आहेत. निवडणूक जवळ आल्याने फलाट आणि लोकल गाडय़ांतील संशयित प्रवाशांकडील सामान तपासले जात आहे. त्यासोबतच लोकल आणि मेल एक्स्प्रेसच्या गाडय़ांतही तपासणी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तर, ‘निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार सर्व रेल्वे स्थानकांत तपासणी सुरू आहे,’ असे मुंबईचे रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले.