अटीतटीच्या लढतीत सुनील कांबळे विजयी

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना तिकीट नाकारून त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना भाजपने येथे उमेदवारी दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे त्यांच्यापुढे आव्हान होते. नवखा उमेदवार, भाजपबाबतची नाराजी, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून मिळालेली आघाडी या बाबींचा विचार करता काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळेल, अशी शक्यता होती. काँग्रेसचे रमेश बागवे यांनी कडवी लढत दिली. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांची मदत आणि एमआयएमच्या उमेदवाराने घेतलेली मते यामुळे सुनील कांबळे यांचा विजय सुकर झाला.

महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनीषा सरोदे यांच्यासह एमआयएमच्या हिना मोमीन आणि वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. हा मतदारसंघ बहुभाषी असून तो राखीव आहे. गेल्या निवडणुकीत दिलीप कांबळे यांनी रमेश बागवे यांना पराभूत केले होते. या मतमदारसंघात मतदानही कमी झाले होते. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता होती. काँग्रेसने पहिल्यापासूनच प्रचारात आघाडी घेतली होती. भाजपबाबतची नाराजी,  प्रलंबित प्रश्न, दिलीप कांबळे यांच्यावरील आरोपांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने  मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. लोकसभा निवडणुकीत येथून काँग्रेसला निसटती आघाडी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत मात्र पहिल्यापासूनच चुरशीची लढत झाली. बागवे आणि कांबळे यांची आघाडी पहिल्यापासून मागे-पुढे होत होती.  यात एमआयएम आणि वंचित विकास आघाडी आणि मनसेने घेतलेल्या मतांचाही परिणाम दिसून आला.

मतदानाला काही दिवस बाकी असताना काँग्रेसचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक सुधीर जानजोत यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हीच बाब भाजपच्या पथ्यावर पडली. मतदारसंघातील जातींची समीकरणे जुळविण्यातही त्यांना यश आले. काँग्रेसला काही भागातून मोठे मतदान झाले. मात्र सुनील कांबळे यांनी ५ हजार १२ मतांनी निसटता विजय मिळविला.

५२,१६० सुनील कांबळे- (भाजप)

४७,१४८ रमेश बागवे- (काँग्रेस)