दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी सहज विजय मिळवित पर्वती विधानभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकाविला. भाजपच्या अन्य उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवित माधुरी मिसाळ यांनी एकतर्फी वर्चस्व राखले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांचा त्यांनी ३६ हजार ७६७ अशा दणदणीत फरकाने पराभव केला.

गुजराथी समाज, व्यापारी वर्ग, मोठा भौगोलिक विस्तार अशी या मतदारसंघाची ओळख आहे. स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता, सर्वाधिक नगरसेवक अशी भाजपची ताकद येथे आहे. भाजपची संघटनात्मक ताकदही या मतदारसंघात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम या मिसाळ यांना आव्हान देणार का, हाच प्रश्न उपस्थित होत होता. मात्र कदम यांना कडवी लढत देता आली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ स्वत:कडे घेतला होता. त्यामुळे काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंडखोरी केली. मात्र ती शमविण्यात यश आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघात ताकद आहे, असा दावा केला जात होता. बदललेली राजकीय समीकरणे आणि जुन्या आकडेवारीचे दाखलेही त्यासाठी देण्यात येत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देता आले नाही. काँग्रेसची साथही मिळाली नाही, तर व्यापारी वर्गही भाजपच्या बाजूने माधुरी मिसाळ यांच्या मागे उभा राहिल्याचे दिसून आले. पर्वती विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या २७ असून त्यामध्ये भाजपचे २३ नगरसेवक आहेत.

या भागात भाजपची संघटनात्मक बांधणी भक्कम आहे. महापालिका निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर आले. विधानसभा निवडणुकीतही भाजपला सातत्याने यश मिळाले आहे. महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातून मोठय़ा संख्येने पक्षाचे नगरसेवक विजयी झाले. हीच ताकद मिसाळ यांच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.

९७,०१२ माधुरी मिसाळ- (भाजप)

६०,२४५ अश्विनी कदम- (राष्ट्रवादी काँग्रेस)