•  संजय शिरसाट, अतुल सावे, प्रदीप जैस्वाल विजयी
  •   एमआयएम-वंचित आघाडीला फटका

औरंगाबाद शहरातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघातून अनुक्रमे भाजपचे अतुल सावे, शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल व संजय शिरसाट हे तिघे विजयी झाल्याने औरंगाबाद शहरावर महायुतीचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढल्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणात एमआयएमचे इम्तियाज जलील हे मध्य मतदारसंघातून विजयी झाले होते. या वेळी  मात्र एमआयएम आणि वंचित आघाडीचे उमेदवार पूर्व मतदारसंघ वगळता स्वतंत्रपणे लढल्यामुळे त्यांना फटका बसला आहे.

औरंगाबाद पूर्व मतदासंघातून भाजपचे उमेदवार अतुल सावे व एमआयएमचे डॉ. गफार कादरी यांच्यात अटीतटीची लढत झाली. राज्यात वंचित आघाडी व एमआयएमची युती तुटलेली असताना पूर्व मतदारसंघात डॉ. गफार कादरी यांना वंचितकडून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला होता. त्याचा परिणाम डॉ. गफार कादरी यांना सुरुवातीपासूनच आघाडी मिळत गेली. सहाव्या फेरीपर्यंत डॉ. कादरी यांची आघाडी तब्बल ५२ हजार मतांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे सावे यांच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली होती. मात्र सहाव्या फेरीनंतर सावे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांना डॉ. कादरी यांची आघाडी तोडण्यासाठी १८ व्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागली. अखेर २३ व्या फेरीत सावे यांनी १४ हजार २१६ मतांनी विजय प्राप्त केला. सावे यांना ८८ हजार ७६२ तर डॉ. कादरी यांना ७६ हजार ३०४ मते मिळाली. पूर्व मतदारसंघात काँग्रेसकडून युसूफ मुकाती व समाजवादी पार्टीकडून कलीम कुरेशी हे उमेदवार होते. डॉ. कादरी, मुकाती व कुरेशी यांना मिळालेल्या मतांमुळे मुस्लीम समुदायातील मतांचे ध्रुवीकरण झाले. त्याचा फायदा सावे यांना झाला. सावे हे मागील निवडणुकीपेक्षा तब्बल दहा हजारपेक्षाही अधिक मते घेऊन विजयी झाले.

मध्य मतदारसंघातील मुस्लीम मतांच्या फाटाफुटीमुळे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. प्रदीप जैस्वाल यांना ८२ हजार २१७ तर एमआयएमचे नासेर सिद्दीकी ६८ हजार ३२५ एवढी मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांना २७ हजार ३०२ तर राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांना ७ हजार २९० मते मिळाली. एक हजार ३४७ मते नोटाला मिळाली.

राखीव असलेल्या पश्चिम मतदारसंघातून कोण विजयी होतो, या विषयी तर्कवितर्क लढवले जात होते. तेथे शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांनी आव्हान उभे केल्याचे चित्र होते. मात्र अखेर संजय शिरसाट यांनी तिसऱ्यांदा विजय संपादन केला. त्यांनी २५व्या फेरीअखेर भाजपचे बंडखोर  अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा ४० हजार ५४ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात एमआयएम व वंचित आघाडीच्या उमेदवारांचेही आव्हान होते. एमआयएमचे अरुण  बोर्डे यांना ३९ हजार २१,१ तर वंचितचे संदीप  शिरसाट यांना २५ हजार ५०० मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये संजय शिरसाट यांना ६९३, राजू शिंदे यांना ३०२, अरुण बोर्डे यांना १२५, संदीप शिरसाट यांना १४९ मते मिळाली. पश्चिममध्ये एकूण १ लाख ९८ हजार १८२ एवढे मतदान झाले.