माळी, मराठा, मुस्लिम समाजाची निर्णायक मते हडपसर मतदारसंघात निर्णायक ठरतात. ही सर्व मते खेचण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार चेतन तुपे यशस्वी ठरले. त्यामुळे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना चेतन तुपे यांनी पराभवाचा धक्का दिला. टिळकेर यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, पक्षांतर्गत नाराजी, मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसने टिळेकर यांना रोखण्यासाठी केलेली व्यूहरचना याचा फटका टिळेकर यांना बसला.

विद्यमान आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांच्यासह मनसेचे वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात होते. गेली निवडणूकही त्यांनी एकमेकांविरोधात लढविली होती. यावेळी आघाडीने हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. मनसेने टिळेकर यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने हेच मुद्दे प्रचारात घेतले. हडपसरमधील गावकी, भावकीचे राजकारण आणि काँग्रेसची साथही तुपे यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. गेल्या निवडणुकीत पक्षांतर्गत वाद तुपे यांच्यासाठी अडसर ठरले होते. यंदा ते मिटविण्यात तुपे यांना यश आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारीही तुपे यांच्या पाठीशी उभे राहिले. टिळेकर यांना शिवसेनेच्या नाराजीचा आणि पक्षांतर्गत बंडाळीचा फटका बसला. शिवसेनेकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. तर मनसे उमेदवार वसंत मोरे यांनी घेतलेल्या मतांचा परिणामही टिळेकर यांच्या मतांवर झाल्याचे दिसून आले. माळी-मराठा अशी जातीची समीकरणे जमविण्यात तुपे यांना यश आले. मनसेला मात्र अपेक्षित लढत देता आली नाही. तुपे यांनी टिळेकर यांचा २ हजार ८२० मतांनी पराभव केला.

९२,३२६ चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस)

८९,५०६ योगेश टिळेकर (भाजप)