संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील विजयी झाले. मात्र अपेक्षित मताधिक्य मिळविण्यात त्यांना अपयश आले. पाटील यांच्या विजयामुळे हा मतदारसंघ भाजपचा सर्वाधिक सुरक्षित आणि हक्काचा मतदारसंघ असल्यावरही शिक्कामोर्तब झाले. सर्वपक्षांनी पाठिंबा दिलेले मनसेचे किशोर शिंदे यांचा पाटील यांनी २५ हजार ४९५ मतांनी पराभव केला.

मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील यांना कोथरूड येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय भाजपने घेतला. पाटील जनतेमधून निवडून येऊ शकत नाही, त्यांचा नेहमी मागील दाराने विधिमंडळात प्रवेश होतो, अशी टीका भाजप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत होती. विरोधी पक्षांनी बाहेरचा उमेदवार असा त्यांच्याविरोधात प्रचार केला होता. मतदारसंघातील आमदार मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारल्यानंतर ब्राह्मण विरोधात मराठा असा वादही रंगविण्यात आला. मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना भाजप विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे पाटील यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती.

गेल्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी ६४ हजारांच्या मताने विजयी झाल्या होत्या. मात्र पाटील २५ हजार ४९५ मतांनी विजयी झाले. संघ शक्तीच्या जोरावर भाजपने या मतदारसंघात बाजी मारली. पाटील यांनी पहिल्यापासून आघाडी घेतली. मात्र ती फार मोठी ठरली नाही. विशेष म्हणजे या मतदारसंघातून खासदार गिरीश बापट यांना लाखाचे मताधिक्य मिळाले होते.

१,०५,२४६ चंद्रकांत पाटील (भाजप)

७९,७५१ किशोर शिंदे (मनसे)